PSI Result News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून फेब्रुवारी २०२० पोलीस उपनिरीक्षक पदासह, कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी पदांसाठी संयुक्त भरती प्रक्रिया सुरू झाली होती. कोरोनाचे संकट आणि इतर कारणांमुळे ही भरती प्रक्रिया लांबत गेली. या काळात उमेदवारही संयम दाखवत या परीक्षेला सामोरे गेले. आता कुठलेही संकट नाही. दरम्यानच्या काळात या प्रक्रियेतील कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. मात्र साडेतीन वर्षे झाले तरी संयुक्त भरती प्रक्रियेतील पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्ती रखडल्या आहेत. (MPSC News)
पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदांची भरती फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू झाली. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखतीसह संपूर्ण प्रक्रिया मार्च २०२३ मध्ये पार पडल्या आहेत. मात्र, अजूनही अंतिम निकाल जाहीर झाला नाही. या निकालाच्या प्रतिक्षेत तब्बल ६५० उमेदवार आहेत. निकाल जाहीर होत नसल्याने संबंधित उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. रखडलेल्या या निकालामुळे आयुष्य अनिश्चिततेच्या गर्तेत गेल्याची भावना उमेदवार व्यक्त करीत आहेत. (Competitive exams)
'पीएसआय' पदासाठी मुलाखत देणाऱ्या उमेदवार श्वेताने नाराजी व्यक्त केली. श्वेता म्हणाली, "पोलीस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व आणि मुख्य परीक्षेसह मैदानी चाचणीही पूर्ण झाली आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मुलाखतीही पार पडल्या. आमच्यासोबत परीक्षा देणाऱ्या कर निरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी पदांसाठी पात्र ठरलेले उमेदवार सेवेत रुजू झाले आहेत. मात्र अजूनही आमची सर्वसाधारण गुणवत्ता यादी किंवा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही."
दरम्यान, अंतिम निकाल हा एसईबीसी ते इडब्ल्यूअस संदर्भातील आरक्षण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे हा निकाल थांबविला असल्याचा आरोपही पात्र उमेदवारांनी केला आहे. (PSI Result)
या रखडलेल्या प्रक्रियेबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी स्टुडंट राईट्स असोसिएशनचे महेश बडे यांनी केली आहे. बडे म्हणाले, "आरक्षणाबाबत निर्णय राज्य सरकारने घेत आयोगाला निर्देश देणे गरजेचे आहे. मात्र, शासनाकडून या संदर्भात कोणतीच हालचाल केली जात नाही. पर्यायाने आयोगालाही निकाल घोषित करता येत नाही. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून तातडीने या संदर्भात अध्यादेश काढावा." (MPSC Result News)
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आवर सचिव सुनील अवताडे म्हणाले, "पोलीस उपनिरीक्षक पदाचा अंतिम निकाल हा आरक्षणाशी निगडीत आहे. राज्य शासनाने या संदर्भात आम्हाला निर्देश देणे गरजेचे आहे. त्यानंतरच पुढची प्रक्रिया होईल."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.