Mumbai News : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावं यासाठी काही आमदाराची इच्छा आहे. अशातच अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना डच्चू द्यावा, असे सांगितल्याचे समजते.
मंत्रिमंडळातून शिवसेनेच्या चार ते पाच मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या चर्चांना शिंदे गटातील नेत्यांनी अफवा असल्याचे म्हटलं आहे.
सध्या भाजप-शिवसेना युतीच्या जाहिरातीवरुन वाद सुरु आहे. यात आणखी नव्या वादाची भर पडली आहे. शिवसेनेच्या ज्या पाच मंत्र्यांच्या 'कारभारा'वर भाजप पक्षश्रेष्ठी नाराज असल्याचे समजते, त्याच मंत्र्यांचे फोटो आजच्या नवीन जाहिरातीत झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजपने नाराजी व्यक्त केलेल्या शिवसेनेच्या या मंत्र्यांचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिरातीत प्रसिद्ध केले आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या या नाराजीकडे कानाडोळा करीत आपल्या मंत्र्यांना समर्थनच दिल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची चर्चा आहे . तर दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांचे फोटो नसल्याने ते नाराज असल्याचीही माहिती आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ,अन्न व औषध प्रशासनमंत्री संजय राठोड या शिवसेनेच्या पाच मंत्र्यांबाबत भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात कमालीची नाराजी आहे.
या मंत्र्यांच्या कारभाराविषयी स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे. हे मंत्री मनमानी करीत असल्याची तक्रार त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. मंत्रीपद घेऊन सरकारची कामगिरी लोकांत पोचविण्यात कमी पडलेल्या तसेच लोकसभा निवडणुकीत ताकद दाखवू न शकणाऱ्यांना या मंत्र्यांना‘नारळ‘ मिळू शकतो. त्यामुळे नव्या मंत्र्यांच्या नावाबरोबरच बाहेरचा रस्ता कुणाला दाखवणार याचीच चर्चा अधिक आहे.
यावरून आता राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. "कोणाला मंत्री ठेवायचं हा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे," अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तर मंत्री संदीपान भुमरे ही अफवा असल्याचं म्हणत आहेत.
“मंत्रिमंडळातून डच्चू देणार या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या आहेत.मंत्रिमंडळ विस्तार जवळ आला की आशा बातम्या येत असतात”, असं भुमरे म्हणाले. या सर्व बातम्यांमध्ये काहीही तथ्थ नाही, असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. ज्या मीडियानं या बातम्या दिल्या त्यांना त्यांनी थेट आव्हानही दिलं.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.