Vadgaon Sheri Assembly election Sarkarnama
पुणे

Mahayuti Seat Sharing: अजितदादा की फडणवीस कुणाचा शब्द खरा ठरणार? मुळीक, टिंगरे 'गॅसवर'

Vadgaon Sheri Assembly Constituency: विद्यमान आमदार चेतन तुपे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात अली. मात्र वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा यादीमध्ये समावेश नसल्याने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात होतं.

Sudesh Mitkar

Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर होत असताना पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा सस्पेन्स मात्र वाढत चालला आहे.

महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार आणि उमेदवारी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना मिळणार की विद्यमान आमदार सुनील टिंगरे उमेदवारी राखणार याबाबत मोठ्या प्रमाणात दावे प्रति दावे होताना पाहायला मिळत आहेत. एखादा सस्पेन्स चित्रपटाप्रमाणे सध्या वडगाव शेरीतील उमेदवारी बाबत घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली 38 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. या ठिकाणी विद्यमान आमदार चेतन तुपे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात अली. मात्र वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा या यादीमध्ये समावेश नसल्याने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात होतं.

यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच सुनील टिंगरे यांनी माध्यमांसमोर येऊन अजित पवार यांनी आपल्याला शब्द दिला असून आज नाहीतर उद्या आपली उमेदवारी जाहीर होईल, असा विश्वास व्यक्त केला. आपल्याला दादांकडून एबी फॉर्म मिळाला असल्याचा देखील त्यांनी जाहीरपणे सांगितलं.

दुसरीकडे भाजपकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार जगदीश मुळीक यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू करीत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी आपल्याला वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचा देखील सांगितलं.

त्यामुळे सध्या भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या इच्छुकांकडून आपल्याला वरिष्ठांकडून शब्द मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नेमका कोणत्या पक्षाच्या वरिष्ठांचा शब्द खरा ठरणार आणि वडगाव शेरीचा महायुतीचा उमेदवार नेमका कोण असणार याबाबतचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे.

आज भाजपची आणि राष्ट्रवादीची देखील दुसरी यादी येण्याची शक्यता आहे. या यादीनंतरच वडगाव शेरीतील विधानसभेची गणित काय राहतील हे स्पष्ट होणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT