Narendra Modi | Amit Shah Sarkarnama
पुणे

INDIA vs Bharat : मेक इन इंडिया..सारख्या घोषणा देणाऱ्यांवर इंडिया'चे नाव बदलण्याची वेळ का आली ?

उत्तम कुटे

Pune Political News : 'इंडिया' या शब्दावरुन सध्या देशभर मोठे वादळ उठलेले आहे. मग इंडिया म्हणजे विरोधी पक्षांची इंडिया आघाडी असो वा देशाचे नाव बदलाची चर्चा. त्यावरून मोठे वादंग सुरु झालेले आहे. पण, ७६ वर्षानंतर निवडणुकीच्या तोंडावरच देशाच्या नावाचं नव्याने बारसं का करावंसं वाटतंय, कुणाला ,याचा जरा विचार झाला पाहिजे.कारण त्यातच ग्यानबाची मेख दडलेली आहे.

मेक इन इंडिया,स्किल इंडिया, पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया,फिट इंडिया,खेलो इंडियासारख्या घोषणा देऊन इंडिया शब्द लोकप्रिय करणारे भाजप, त्यांचे केंद्रातील सरकार व त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच इंडियाचे भारत करण्याची वेळ का आली हे पाहणेही रंजक आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९४९ मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जींच्या इंडियाऐवजी भारत या नावाच्या प्रस्तावाला आक्षेप नसलेल्या कॉंग्रेसचा आता विरोध का आहे,यामागेही रहस्य दडलेलं आहे.भाजपचा भारत नावाला काँग्रेसचा असलेला सध्याचा विरोध यामागे निव्वळ राजकारण दडलेलं आहे.

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. हॅटट्रिक करण्यासाठी भाजपने ती आपल्या खूपच प्रतिष्ठेची केली आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यांना पुन्हा सत्तेत यायचा असल्याने त्यासाठी त्यांचा मोठा आटापिटा सुरु आहे. पण, पत्ते त्यांच्या बाजूने सध्या पडत नाहीत,अशी स्थिती आहे.वाढती महागाई आणि बेकारीमुळे मतदारांत मोठा असंतोष आहे.तोच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने कॅच केला आहे. त्यामुळे जनमत फिरू लागले आहे. इंडिया आघाडीच्या बाजूला वळू लागले आहे. भाजपच नाही, तर मोदींच्याही लोकप्रियतेत थोडीशी का होईना घट होऊ लागली आहे. हेच भाजपचे अवघड जागेवरचं दुखणे झाले आहे. तोच त्यांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरला आहे.

सध्या काही पत्ते,तरी एनडीएच्या विरोधात,तर इंडिया आघाडीच्या बाजूने पडत आहेत.त्यामुळे भाजप धास्तावला आहे. त्यांनी पुन्हा देशभक्तीचं कार्ड इंडियाचं बारसं भारत असं करून खेळायचं ठरवलं आहे. त्यासाठीच बहूधा या महिन्यात संसदेचं खास अधिवेशन त्यांनी बोलावलं आहे.कॉंग्रेस मुख्य पक्ष असलेल्या इंडिया आघाडीला छेद देण्याचा प्रयत्न इंडियाचे नामकरण भारत असं करून भाजपचा आहे.

काँग्रेसच भाजपची कट्टर राजकीय शत्रू आहे. तसाच द्वेष ती काँग्रेसच्या नेहरूंचाही तेवढाच करते आहे. देशाच्या फाळणीच्या वेळी मोहमद अली जिना यांनी भारताला इंडिया हे नाव देण्यास कडाडून विरोध केला होता. इंडियाचा अर्थ उपखंड तथा सबकॉन्टिनंट असा होत असल्याने त्यांनी हा विरोध करीत हिंदूस्थान हे नाव सुचविले होते.पण, पंडीत जवाहरलाल नेहरुंनी जिनांची मागणी फेटाळून इंडिया हे नाव आपल्या देशाला दिले होते. त्यामुळे नेहरुंनी दिलेले इंडिया नाव बदलण्याचा छुपा अजेंडा भाजपचा असल्याचे कळते. त्यातून त्यांना दुहेरी फायदा होईल,असे त्यांना वाटते आहे. नेहरूंनी दिलेले नाव बदलल्याचं मानसिक समाधान, तर मिळणार आहेच. पण देशभक्तीचा ढिंढोराही आगामी लोकसभा निवडणुकीत पिटवून फासे उलटे पडत असलेल्या परिस्थितीत मतांची बेगमी करण्याचाही त्यांचा मानस आहे. फक्त हे बारसं करून त्यांचा हा हेतू साध्य होतो, का हे लवकरच दिसणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT