Pune News : दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटांत राडा झाला आहे. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण आहे. यवतमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. या तणावामुळे यवतमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जमलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तणाव का निर्माण झाला याबाबत माहिती दिली आहे.
दौंड तालुक्यातील यवत या गावात दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यवतमधील घटनेवर बोलताना म्हणाले की, 'कोणीही कायदा हातात घेऊ नये. मी या घटनेबाबत माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी एका बाहेरच्या व्यक्तीने वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने हा तणाव निर्माण झाला. त्यामुळे काही नागरिक रस्त्यावर आले होते, या जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला.'
जगताप, पडळकर यांना क्लिनचीट
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना क्लिनचीट दिली. पडळकर आणि जगताप यांच्या सभेनंतर हा राडा झाल्याचे आरोप केले जात होते. येथील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दोन्ही समाजाची मंडळी एकत्र बसलेली आहेत, तणाव कमी करण्याचे काम सुरु आहे. जाणीवपूर्वक असा तणाव निर्माण करण्याचे काम केले जात आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,अफवावर कोणी विश्वास ठेऊ नये.
यवतमधील काही व्हिडिओ समोर आले होते, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, 'यवतमध्ये आता शांतता आहे. समोर आलेले व्हिडिओ यवतमधील आहेत की बाहेरील आहेत हे बघावे लागेल. अशा प्रकरणांमध्ये बाहेरचे व्हिडिओ दाखवले जातात. याची चौकशी केली जाईल. मी लोकांना शांतता राखण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन करत आहे.
यवतमध्ये गेले दोन-तीन दिवस तणावपूर्ण वातावरण होते. सर्वांशी संपर्क करुन तणाव निवळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. आता तिथे जमाव जमला आहे, त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे दौंडचे आमदार राहुल कूल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकारानंतर यवत येथे पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.