Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : शुभांगी पाटील अन् सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवर फडणवीस स्पष्टच बोलले...

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadnavis : नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणुकीत शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीला (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाठिंबा देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सत्यजीत तांबे यांना नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजप पाठिंबा देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस म्हणाले, ''याबाबत योग्य वेळी खुलासा केला जाईल. परिस्थितीवर नजर ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्टी आपणास समजतील'', असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

राज्यातील गुन्हे आणि कायदा-सुव्यवस्था यासंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. १४) पुण्यातील पाषाण रोडवरील 'सीपीआर'मध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी फडणवीस म्हणाले, ''विद्यमान राज्य सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला थारा नाही. मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकास बट्टा लावण्याचे काम केले. महाराष्ट्र पोलिसांना पुन्हा तो नावलौकिक मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे, असं म्हणत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) घणाघात केला.

ते पुढे म्हणाले, ''राज्य पोलीस दलात नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये पारदर्शकता होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंग आणि ट्रान्सफरमध्ये कोणालाही भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागले नाही. त्यामुळे आता पोलिस अधिकारी-कर्मचारीही पारदर्शकपणे काम करतील, अशी अपेक्षा आहे.

आजच्या क्राईम परिषदेत वर्ष २०२२ मधील गुन्ह्यांबाबत आढावा घेण्यात आला आहे. कोणत्या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली, कोठे कमतरता आहे याबाबत चर्चा करण्यात आली. वाढ झालेल्या गुन्ह्यांबाबत विश्लेषण करण्यात आले. गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत'', असे त्यांनी सांगितले.

''राज्य पोलिस दलाने ड्रग्ज विरोधात मोहीम हाती घ्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. त्यादृष्टीने नियोजन आम्ही करीत आहोत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेषतः वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलने होत आहेत. जातीय, धार्मिक तणाव निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. त्या कशा कमी करता येतील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत'', असे फडणवीसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT