Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar: 'देवाला प्रार्थना करतो विधानसभेपर्यंत महायुती...'; अजितदादांच्या आमदाराचा नेमका खळबळजनक दावा काय?

सरकारनामा ब्यूरो

Lok Sabha Election 2024: राज्यातील महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. अधूनमधून युतीतील नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असते. शिवाय अनेक ठिकाणच्या जागावाटपाबाबतही युतीत एकमत नसल्याचं दिसत आहे. यामध्ये नाशिक, ठाणे लोकसभा मतदारसंघांतील युतीचा उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे युतीतील मित्रपक्षांमध्ये एकमत नसल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार सुनील शेळके यांनी 'विधानसभा निवडणुकांपर्यंत महायुती (Mahayuti) टिकून राहावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो,' असं वक्तव्य केल्यामुळे अनेक राजकीय तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

लोकसभेच्या निवडणुकांनंतर (Lok Sabha Election) राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं वक्तव्य आमदार शेळकेंनी (Sunil Shelke) केलं. त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे (Srirang Barne) आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंसमोर हे वक्तव्य केलं आहे. शिवाय महायुतीकडून बारणेंचा प्रचार योग्यरित्या सुरू आहे का? असा प्रश्नही शेळकेंनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवाय मला बाजूला ढकलण्याचं नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी सुरुंग लावून ठेवला आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला डिवचलं आहे. भरसभेत शेळकेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वेळी शेळके म्हणाले, "माझ्या आमदारकीच्या काळात मी जे भोगलं, ते पुढच्या 25 वर्षांत कोणाला अनुभवता येणार नाही. मागील पाच वर्षांतील फोडाफोडीचं राजकारण आपल्याला पटलं नाही." शेळके हे सर्व उघडपणे बोलल्यामुळे युतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आधी विरोध आता प्रचार

महत्त्वाची बाब म्हणजे श्रीरंग बारणेंना उमेदवारी देण्यासाठी सुरुवातीला सुनील शेळकेंनीच विरोध केला होता. मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीवर दीड लाखाच्या लीडने निवडून येईल, असा उमेदवार मावळात आहे, असं म्हणत त्यांनी बारणेंच्या उमेदवारीला आपल्याकडे पर्याय असल्याचं सुचवलं होतं. शिवाय ते बारणेंचा प्रचार करणार की नाही हेदेखील ठरलं नव्हतं.

परंतु, अजित पवारांच्या (Ajit Pawar) आदेशामुळे शेळके बारणेंच्या प्रचारात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. शिवाय अजित पवार आमचे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमागे आम्ही ठामपणाने उभे राहणार आहोत. मात्र, युतीधर्म फक्त राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी पाळायचा असं काही नाही. शिवसेना, भाजपनेही युतीधर्म पाळला पाहिजे. शिवाय वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून एकत्र काम केलं पाहिजे, असंही शेळके जाहीर कार्यक्रमात बोलले.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT