Sharad Pawar: पवारांच्या डावपेचांमुळे महायुतीचं टेन्शन वाढलं, माढ्यापासून नगरपर्यंत लावली फिल्डिंग

Lok Sabha Election 2024: पक्षात पडलेले दोन गट, नेते मंडळींनी अजित पवारांना दिलेली साथ यामुळे शरद पवारांना उमेदवार मिळणार नाहीत, अशी चर्चा विरोधक करत होते. मात्र, पवारांनी वाट्याला आलेल्या मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार देत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar NCP News: शिवसेनेनंतर शरद पवारांची (Sharad Pawar) राष्ट्रवादी फोडण्यात भाजप (BJP) यशस्वी झाला. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर अनेक आमदार अजित पवारांच्या गटात सामील झाले. त्यामुळे शरद पवारांकडे नेत्यांचं पाठबळ नसल्याचं बोललं जात होतं. काही दिवसांपर्यंत तसं चित्रही दिसत होतं.

परंतु, लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) जवळ आल्यापासून शरद पवारांनी नवनवीन राजकीय डाव टाकून महायुतीचं टेन्शन वाढवलं आहे. या वयातही पवार पायाला भिंगरी बांधून पुन्हा एकदा पक्षाच्या फेरबांधणीला लागले आहेत. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 10 जागा वाट्याला आल्या. या मतदारसंघात एकास एक उमेदवार देऊन पवार महायुतीची कोंडी करण्यात यशस्वी झाले आहेत.

आघाडीच्या (MVA) जागावाटपात शरद पवार (Sharad Pawar) गटाला 10 जागा मिळाल्या आहेत. मात्र पक्षात पडलेले दोन गट, नेते मंडळींनी अजित पवारांना (Ajit Pawar) दिलेली साथ यामुळे शरद पवारांना उमेदवार मिळणार नाहीत, अशी चर्चा विरोधक करत होते. मात्र, पवारांनी वाट्याला आलेल्या मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार देत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यासह देशातील सर्वाधिक चुरशीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून बारामती मतदारसंघाकडे (Baramati) पाहिलं जात आहे. या ठिकाणी शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. या मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना निवडून आणण्यासाठी जुने मित्र आणि पारंपरिक विरोधकांसह सर्वसामान्य मतदारांना साद घातली आहे. बारामतीसह पवारांनी शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि सातारा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde) यांच्यासाठीही जुळवाजुळव करताना दिसत आहेत.

तर अनेक वर्षांपासून काँग्रेसकडे असलेल्या वर्धा मतदारसंघात (Wardha Constituency) मागील दोन निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांचा विजय झाला होता. मात्र, या वेळी काँग्रेसचे आमदार अमर काळेंना उमेदवारी देत शरद पवारांनी या मतदारसंघात नवीन डाव टाकला आहे. अमर काळे हे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचे भाचे आहेत, तर रावेरमधून नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादीत आलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांना पवारांनी उमेदवारी दिली आहे. पाटील हे उद्योजक असून राजकारणातील नवखा चेहरा आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar News : जानकरांनी घेतली शरद पवारांची भेट, फडणवीसांच्या चार्टर विमानाचा खर्च वाया जाणार?

अहमदनगर दक्षिणमधून कोरोना काळात उत्तम कामगिरी केलेल्या नीलेश लंकेंना (Nilesh Lanke) राष्ट्रवादीने उमेदवारी देत भाजप उमेदवारासमोर आव्हान निर्माण केल्याचं दिसत आहे. भिवंडीच्या ग्रामीण भागातील लोकप्रिय नेते सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीनेही चुरस निर्माण करण्यात राष्ट्रवादीला यश आले आहे.

जानकरांच्या बदल्यात मोहिते-पाटील

महाविकास आघाडीला माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार मिळत नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते, तर शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपने जानकर यांना पुन्हा महायुतीत घेत पवारांना धक्का दिला. पण पवारांनी माढ्यातून थेट मोहिते-पाटील यांचाच हुकमी एक्का बाहेर काढला. पवारांनी माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांना (Dhairyasheel Mohite Patil) उमेदवारी दिल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com