PMC News: पुणे महापालिकेतील मिळकतकर आकारणी व कर संकलन विभागात शुक्रवारी एक खळबळजनक घटना घडली. प्रॉपर्टी टॅक्स अधिक लावल्यानं एका तरुणानं चक्क खिशातून पिस्तुल काढत स्वतःच्याच डोक्याला लावली. यामुळं एकच गोंधळ उडाला, या प्रकारामुळं अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान संबंधित तरुणाविरुद्ध महापालिकेकडून रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.
महापालिकेमध्ये महापौर, उपमहापौर निवडणुकीवेळी परवानाधारक पिस्तूल असणाऱ्या व्यक्तीचा वावर सुरु होता. हा प्रकार महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आला होता, मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नाही. दरम्यान, मिळकत कराची थकबाकी असणाऱ्यांसाठी महापालिकेने अभय योजना जाहीर केली होती. या योजनेची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. संबंधित योजनेअंतर्गत मिळकत कराबाबत चर्चा करण्यासाठी तरुण महापालिकेच्या मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाकडे आला होता.
दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मिळकत कर विभागाच्या कार्यालयामध्ये संबंधित तरुणाकडून कर्मचाऱ्यांना थकबाकीबाबत विचारणा करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी मिळकतकराच्या थकबाकीबाबत माहिती दिल्यानंतर संबंधित कर जादा असल्याचे सांगत तरुण संतप्त झाला. त्याने त्याच्याकडील पिस्तूल बाहेर काढत थेट धमकावले. त्यानंतर, त्याने पिस्तूल स्वतःच्या डोक्याला लावत मी आता आत्महत्या करणार असे सांगत तो कार्यालयाबाहेर आला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळं तेथे उपस्थित असलेले महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी घाबरले. काही कर्मचाऱ्यांनी त्यास समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, दरम्यान महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तेथे दाखल झाले. त्यांच्यासह एका नगरसेविकेकडूनही संबंधित तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, महापालिका प्रशासनाने संबंधित तरुणाच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी दिली.
महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसमोर पिस्तूल काढून आत्महत्या करण्याची धमकी एका तरुणाने दिली. हा अतिशय गंभीर प्रकार आहे, संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला जाईल. इतकेच नव्हे, तर संबंधित तरुणाकडील शस्त्र जप्त करण्याबाबत पोलिसांशी चर्चा केली जाईल, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.