Morgaon, 06 July : पिराच्या कंदुरीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या बारामतीमधील तरुणाचा फलटण-पुसेगाव मार्गावर ताथवडे घाटात चारचाकी गाडीवर दरड कोसळून जागीच मृत्यू झाला. गाडीतील इतर किरकोळ जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या तरुणाचे येत्या दिवाळीत लग्न करण्याची तयारी कुटुंबात सुरू होती. त्याच्यावरच काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
योगेश पोपट जगताप (वय, 27, रा. आंबी खुर्द, ता. बारामती) असे दरळ कोसळून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, चुलते असा परिवार आहे. एकुलता एक मुलगा काळाने हिरावून नेल्याने जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील खातगुण येथे योगेश याचे वडील पोपट जगताप यांचे आंबी खुर्द येथील मित्र समीर मुनावर शेख यांचा पिराचा कंदुरीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला योगेश जगताप, त्याचे वडील पोपट जगताप यांच्यासह समीर शेख यांचे नातेवाईक मदिना शेख, सानिया शेख, तबसूम शेख, तनजीला शेख हे चारचाकी गाडीतून (MH 42, BE 2246) निघाले होते.
योगेश जगताप हा स्वतः गाडी चालवत होता. फलटण ते पुसेगाव रस्त्याने जात असताना ताथवडे घाटात गाडी आल्यानंतर दरड कोसळली. त्यात एक मोठा दगड वाहनाच्या पुढील बाजूने काच फोडून थेट गाडीत आला. तो दगड गाडी चालवत असणाऱ्या योगेश जगताप याच्या छातीवर आदळला.
योगेश जगताप याच्या छातीवर दगड जोरात आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे नियंत्रण सुटून गाडी पुढे जाऊन थांबली. गाडीतील इतर किरकोळ लोक जखमी झाले आहेत.
योगेश हा पोपट जगताप यांचा एकुलता एक मुलगा होता. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. संपूर्ण कुटुंब त्याच्यावर अवलंबून होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पोपट जगताप यांनी योगेशला शिकवून स्वतःच्या पायावर उभे केले होते. दिवाळीत त्याचं लग्न करण्याची जोरदार तयारी कुटुंबात सुरू होती. मात्र, नियतीने त्यापूर्वीच कुटुंबापासून योगेशला हिरावून नेले. योगेशच्या मृत्यूने जगताप कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.