Solapur DCC Bank Election : सोलापुरात पुन्हा रंगणार मोहिते पाटील VS गोरे सामना : सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत ठरणार गेमचेंजर

BJP Vs NCP SP : विधान परिषद निवडणुकीनंतर आता सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मोहिते पाटील आणि भाजप नेत्यांमध्ये पुन्हा राजकीय संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.
Solapur DCC Bank Election
Solapur DCC Bank Election Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 06 July : विधान परिषद निवडणुकीत उडालेला राजकीय धुरळा खाली बसण्याआधीच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यातच मोहिते पाटील विरुद्ध भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे असा रंगलेला सामना पुन्हा एकदा सोलापुरात होण्याची शक्यता आहे, त्याला सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे निमित्त ठरणार आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक येत्या बुधवारी (ता. ८ जुलै ) सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. बुधवारी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय आदेश देते, यावर बॅंकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अवलंबून आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीशी तालुक्यातील सहकार क्षेत्रामधील नेत्यांचा थेट संबंध येतो, त्यामुळे बॅंकेची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात मुकाबला रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र, गोरेंसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार राजेंद्र राऊत हे गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

नगरपरिषदा, महापालिका, जिल्हा परिषद व सोलापूरची विधान परिषद निवडणूक एकहाती जिंकल्याने सोलापूर जिल्ह्याचे वातावरण भाजपमय झाले आहे. डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीसाठी आवश्यक ती ताकद असलेले नेते माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे हे भाजपमध्ये आल्याने ही निवडणूक भाजपसाठी सोपी मानली जात आहे.

Solapur DCC Bank Election
Missing Link Update : मिसिंग लिंकवरून वाहतूक कधी सुरू होणार? : सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी दिली महत्वाची अपडेट

डीसीसीचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांनी सोसायटी मतदारसंघाची वाट दाखविल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे यांचा डीसीसीमध्ये प्रवेश शक्य मानला जात आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनीही बार्शी तालुक्यातील सोसायट्यांच्या राजकारणात दमदार पदार्पण केल्याने त्यांचाही डीसीसीमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे.

सोसायटी मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यातून एक, या प्रमाणे ११ व इतर मतदारसंघांतून ८, असे एकूण १९ संचालक निवडले जातात. महिलांमधून दोन, अनुसूचित जाती-जमातींमधून एक, ओबीसीमधून एक, भटक्या विमुक्त जाती-जमाती/विशेष मागासवर्गातून एक, नागरी बँका व पतसंस्थांमधून एक, दुग्ध संस्था व वैयक्तिक सभासदांमधून एक, कृषी, पणन संस्था, शेतमाल प्रक्रिया संस्था व साखर कारखान्यांमधून एक संचालक निवडला जातो. भाजपमधील उपयुक्त नेत्याची सोय इतर मतदारसंघांतून केली जाऊ शकते.

एकट्या भाजपसाठी निवडणूक कठीण

माळशिरस, बार्शी, अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, करमाळा या सहा तालुक्यांत भाजप व भाजपविरोधी नेत्यांची कमी-अधिक ताकद सोसायट्यांच्या राजकारणात आहे. या सहा तालुक्यांतील सोसायटी मतदारसंघांत चुरस पाहायला मिळू शकते. विधान परिषदेप्रमाणे डीसीसीचीही निवडणूक भाजप महायुती म्हणून लढल्यास विजय सोपा आहे. फक्त भाजप म्हणून निवडणूक झाल्यास भाजपला जिंकण्यासाठी अधिक ताकद खर्ची करावी लागणार आहे.

Solapur DCC Bank Election
Manoharmama Bhosale : मनोहरमामाचा कारनामा : भाविकांना लावला 3 कोटींचा चुना; घोटीचा आश्रम सील, गाणगापूर, कोल्हापुरातून महत्वाची कागदपत्रे जप्त...

राम सातपुतेंची सहकारात होणार एन्ट्री?

माळशिरस तालुक्यातील सोसायट्यांच्या राजकारणात आजही मोहिते-पाटील यांचीच ताकद आहे. या तालुक्यात भाजपने माजी आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी मोठी ताकद लावली आहे. माळशिरस तालुक्याच्या सहकारातही मोहिते-पाटलांना आव्हान देण्यासाठी व भाजपची पाळेमुळे माळशिरसमध्ये अधिक घट्ट करण्यासाठी राम सातपुते यांना भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून संचालकपदाची संधी दिली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com