pimpri crime
pimpri crime Sarkarnama
पुणे

धक्कादायक : पिंपरी बाजारपेठेत पोलिसाला भरदिवसा धक्काबुक्की, कपडेही फाडले

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) पोलिसांचा (Police) दरारा संपला की काय, अशी परिस्थिती शहरात दिसून येत आहे. कारण, एका पोलिस कर्मचाऱ्याला रविवारी (ता. २३ ऑक्टोबर) पिंपरी बाजारपेठेत भरदिवसा धक्काबुक्की करण्यात आली. त्या कर्मचाऱ्याचा गणवेशही फाडण्यात आला आहे. याशिवाय लूटमार, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल हिसकावण्याचे प्रकारही वाढले आहेत, या सर्व घटना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. (Youth scuffles with police in Pimpri market)

पोलिसांना मारहाण, वाहतूक पोलिसाला मारहाण करून मोटारीबरोबर फरपटत नेणे, सरकारी कामात अडथळा आणण्यासह महिलांविषयक गुन्ह्यांत त्यातही विनयभंगाच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या काळात शहराबाहेर गेलेले अवैध धंदे पुन्हा शहरात सुरू झाले आहेत, त्यामुळे झिरो टॉलरन्स ही मोहीम पुन्हा राबविण्याची गरज भासू लागली आहे. शहरात कोयता गॅंग तयार झाल्या आहेत. त्या दहशत पसरवित आहेत. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग ही चिंचेची बाब बनली आहे. खूनासारखे गंभीर गुन्हेही हे मायनर गुन्हेगार करू लागले आहेत.

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. काल रावेत पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला. दिवाळी खरेदीसाठी पतीबरोबर बाहेर पडलेल्या ४८ वर्षीय महिलेचे १२ ग्रामचे गंठण दुचाकीवरील चोराने हिसकावून नेले. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. परवा भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाहूनगर, चिंचवड येथे अशीच लूट झाली. तेथे ४६ वर्षीय विवाहितेचे ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरटयाने हिसकावून पलायन केले. तो ही पोलिसांना सापडला नाही.

पिंपरी वाहतूक विभागातील एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाची एका तरुणाने कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. त्यांचा सरकारी गणवेश फाडण्यापर्यंत आरोपीची मजल गेली. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. निगडी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत यमुनानगर येथे विष्णू गुप्ता या पानटपरीचालकावर रविवारी खूनी हल्ला झाला. त्यातील हल्लेखोरही मोकाट आहे. असाच खुनी हल्ला चिखली येथे कोयताधारी त्रिकूटाने सचिन मोरे या मोटारचालकावर परवा केला. त्यातील हल्लेखोरही पळून जाण्यात यशस्वी झाले.

पिंपरी चिंचवड शहरात व्हाईट कॉलर क्राइम असलेल्या सायबर गुन्ह्यांतही वाढ झाली आहे, त्यासाठी स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याची नितांत गरज भासू लागलेली आहे. ही वाढती गुन्हेगारी नियंत्रणाला प्राधान्य देण्याऐवजी पोलिस अवैध गुटखा आणि दारुविक्री आणि मसास सेंटरवर कारवाई करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT