Congress  Sarkarnama
पुणे

आमच्या मटक्याच्या धंद्याला आडवा येतो का? म्हणत काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर युवा सेनेच्या अध्यक्षाचा हल्ला

Controversy between Congress and Shivsena : या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (जि.पुणे) : सासवड आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करणारे येथील माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव गणेश बबनराव जगताप (रा.सासवड) यांच्यावर कोयत्याने एका समुहाने प्राणघातक हल्ला केला. हा प्रकार रविवारी (ता.१२ फेब्रुवारी) रात्री उशिरा घडला.

जगताप यांच्या दोन चारचाकींचे हल्ल्यात नुकसान करण्यात आले आहे. याबाबत गणेश बबनराव जगताप यांनी सासवड पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. त्यातून जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपी युवा सेनेचा अध्यक्ष सूरज उर्फ बिट्टू चंद्रकांत माने, ओंकार जाधव, सनी माने, अनिकेत जाधव, श्रीजय जाधव (रा.सासवड) आणि अनोळखी दोघांवर गणेश जगताप यांच्या फिर्यादीनुसार सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपींना सोमवारी (ता.१३ फेब्रुवारी) न्यायालयात आरोपींना हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रविवारी (ता.१२ फेब्रुवारी) रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी गणेश जगताप हे त्यांच्या आनंद प्लाझा येथील कार्यालयात बसले असताना त्यावेळी त्यांचा मुलगा प्रेम जगताप हा सोपाननगर येथून समर्थ बैठकीला जावून कार्यालयात आला.

पाच ते सहा मुले एका चारचाकी गाडीतून माझा पाठलाग करीत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर प्रेम हा त्याच्याकडील दुचाकीने, तर गणेश जगताप हे त्यांच्याकडील चारचाकीने तारादत्त पूर्व येथील अभिश्री गार्डन सोसायटी येथील घरी गेले.

गणेश जगताप चारचाकी पार्क करीत असताना समोरून आलेल्या चारचाकीतून पाच ते सहा जण उतरून हातात धारदार कोयते, लाकडी दांडके घेऊन फिर्यादीच्या दिशेने पळत आले. त्यामधे सुरज उर्फ बिट्टू चंद्रकांत माने, ओंकार जाधव, सनी माने, अनिकेत जाधव, श्रीजय जाधव यांच्या हातात कोयते होते.

त्यापाठोपाठ एका दुचाकीवरून अनोळखी दोन मुले आली, त्यांच्या हातातही कोयते होते. त्यांनी सर्वांनी गणेश जगताप यांच्यावर हल्ला चढवला. या वेळी जगताप यांनी प्रसंगावधान दाखवत गाडीतच बसून राहिले.

हल्लेखोरांनी फिर्यादीच्या गाडीच्या बोनेट, दरवाजे, दरवाजे व पुढील काचांवर कोयत्याने मारण्यास सुरूवात केली. आमच्या बिंगो मटक्याच्या धंद्याला आडवा येतो का... तुझ्यामुळे आमचे आर्थिक नुकसान झाले, तुला आज जिवंत सोडत नाही, असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवून गाडीच्या डिकीमध्ये ठेवलेले पन्नास हजार रुपये काढून घेतले.

तसेच, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादीची पार्किंगमध्ये लावलेली जगताप यांची दुसरी चारचाकी स्कार्पिओ फोडली. यावेळी फिर्यादीने आरडाओरडा केल्यानंतर मुलगा प्रेम खाली पळत आला. या प्रसंगी फिर्यादीने जवळील परवानाधारक शस्त्र गाडीतून काढून हल्लेखोरांच्या अंगावर जात असल्याचे कळताच हल्लेखोरांनी पळ काढला.

यातील आरोपी सुरज उर्फ बिट्टू माने हा विना परवाना रिव्हॉल्वर वापरत असून सासवडमध्ये कोयता गँग तयार करून दहशत करीत असल्याचेही फिर्यादी गणेश जगताप यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र महांगडे पुढील तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT