तळेगाव दाभाडे : नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता आता महापालिका निवडणुकीचा आखाडा सुरु आहे. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
मावळ तालुक्यात प्रमुख पक्षांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोणाचे नाव अंतिम यादीत येणार आणि कोणाला डावलले जाणार, याबाबत स्पष्टता नसल्याने अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बदलणार आहे.
इच्छुकांच्या प्रचारातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे महिला मतदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक सहली. मतदारसंघात प्रभाव निर्माण करण्याच्या उद्देशाने काही इच्छुकांनी १०० ते १५० बसगाड्या लावून महिला मतदारांना विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी नेले. त्याचबरोबर घरोघरी साड्यांचे वाटपही सुरू केले आहे.
गेल्या आठ महिन्यांपासून इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व राजकीय गुंतवणूक करत प्रचारावर भर दिला आहे. जनसंपर्क वाढविण्यासाठी बैठका, गटबांधणी, कार्यक्रम, आखाडेबदल तसेच मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. या प्रचारावर आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
कोल्हापूर महालक्ष्मी, अक्कलकोट स्वामी समर्थ, पंढरपूर विठ्ठल–रुक्मिणी मंदिर, शिर्डी साईबाबा आदी ठिकाणी या सहली आयोजित करण्यात आल्या. नाश्ता, जेवण, विश्रांतीची व्यवस्था तसेच भजन–कीर्तन यांसारखे कार्यक्रमही ठेवण्यात आले. या सर्व उपक्रमांवर काही इच्छुकांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.
एवढ्या मोठ्या खर्चानंतरही उमेदवारी निश्चित न झाल्याने इच्छुकांमध्ये चिंता वाढली आहे. 'नाव जाहीर होणार की नाही? या संभ्रमामुळे अनेक इच्छुकांवर आर्थिक ताण आला असून काही ठिकाणी प्रचाराचा वेगही मंदावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये काही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर झाली असली, तरी अनेक गट व गणांमध्ये अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. नेतेमंडळींच्या एका शब्दाच्या प्रतीक्षेत इच्छुकांची झोप उडाली आहे.
मावळात पूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपरिषद निवडणुकांमध्ये फारसा खर्च होत नव्हता. मात्र गेल्या दहा वर्षांपासून, विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीपासून खर्चाचा पॅटर्न पूर्णतः बदलला आहे.
नुकत्याच झालेल्या तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद तसेच वडगाव नगरपंचायत निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही असाच ‘पैशाचा पाऊस’ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खर्च करण्याची क्षमता असलेल्या इच्छुकांनाच उमेदवारी दिली जात असल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते वंचित राहत असल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढवल्या असून, दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली आहे. तळेगाव नगरपरिषदेत भाजपसोबत युती करण्यात आली होती. नगराध्यक्ष भाजपचा झाला असला, तरी नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची अधिक आहे. निकालानंतर युतीबाबत धुसपूस सुरू झाली होती.
तळेगाव नगरपरिषदेत भाजपसोबत युती करून चूक झाल्याची कबुली देत, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ही चूक टाळून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होण्याचे संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.