Pune News : बीडमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मंत्री धनंजय मुंडे यांनी रोखल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. मात्र, यावरून उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना वापरलेल्या ‘गुंगी गुडीया’ या शब्दावर राष्ट्रवादी काँग्रेसने पलटवार करत काँग्रेसला त्यांच्याच इतिहासाची आठवण करून दिली आहे.
बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत पत्रकाराने प्रश्न विचारला असता मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना बोलण्यापासून रोखल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. "धनंजय मुंडे बीडचे हुकूमशहा आहेत का?" असा सवाल करत काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
याच वादात काँग्रेसने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरही टीका केली. सुनेत्रा पवार यांचा उल्लेख ‘गुंगी गुडीया’ असा करत, "त्या अजून किती दिवस गुंगी गुडीया बनून राहणार?" असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला.
काँग्रेसच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत काँग्रेसच्या भाषेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
"‘गुंगी गुडीया’ हा शब्दप्रयोग भारतीय राजकारणात नवीन नाही. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला विरोधकांनी त्यांच्यावरही अशीच टीका केली होती. परंतु, इंदिराजींनी आपल्या कर्तृत्वाने आणि बांगलादेश मुक्तीसंग्रामासारख्या ऐतिहासिक निर्णयांनी विरोधकांना उत्तर दिले. ज्या शब्दाला काँग्रेसने एकेकाळी महिलांचा अवमान मानले होते, त्याच शब्दाचा वापर आज ते एका महिला लोकप्रतिनिधीविरोधात करत आहेत. याचा अर्थ स्व. इंदिरा गांधींवरील ती टीका योग्य होती, हे काँग्रेस अप्रत्यक्षपणे मान्य करत आहे का?" सवाल उमेश पाटील यांनी केला आहे
हा विषय केवळ एका राजकीय पक्षापुरता मर्यादित नसून सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानाचा आणि राजकीय संस्कृतीचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. लोकशाहीत धोरणांवर कठोर टीका आणि मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही जबाबदार राजकीय पक्षाला शोभत नाही. त्यामुळे काँग्रेसने खासदार सुनेत्रा पवार यांच्याविरोधात केलेला हा अक्षेपार्ह शब्दप्रयोग तात्काळ मागे घ्यावा आणि सार्वजनिक जीवनात सन्मानपूर्वक राजकीय संवादाची संस्कृती जोपासावी, अशी अपेक्षाही पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.