Uddhav Thackeray & Madhav Bhandari
Uddhav Thackeray & Madhav Bhandari Sarkarnama
राज्य

`मुख्यमंत्र्यांचा पदभार दुसऱ्याला देण्याची हीच ती वेळ`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाच्या (Covid-19) तिसऱ्या लाटेची भीती वाढत असताना सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्रात प्रचंड अनागोंदी माजली असून प्रकृतीच्या कारणामुळे प्रदीर्घ काळ राज्य कारभारापासून दूर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आता तरी राज्याच्या प्रमुखपदाची सूत्रे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) किंवा अन्य  सहकाऱ्यांकडे सोपवावीत, आणि राज्याला अनागोंदीपासून वाचवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी शुक्रवारी (ता.14 जानेवारी) केली व मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रकृतीस आराम पडावा अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.

भंडारी म्हणाले, ठाकरेंचा पवारांवर किंवा राष्ट्रवादीवर विश्वास नसेल तर, अन्य 'विश्वासू' सहकाऱ्याकडे कार्यभार सोपवा, पण राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्या. गेल्या वर्षी २२ नोव्हेंबर रोजी ठाकरे यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया झाली, तेव्हापासून पूर्णवेळ मुख्यमंत्री नसल्याने महाराष्ट्र निर्नायकी झाला असून मंत्रिमंडळही भरकटले आहे. अगोदरच कोरोना महामारीचे संकट वाढत असताना कायदा सुव्यवस्था स्थितीही बिघडली आहे. बलात्कार, खून, दरोडे, फसवणूक, भ्रष्टाचाराची प्रकरणे दिवसागणिक वाढत असून राज्य दिशाहीन झाल्याचीच ही लक्षणे आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्री मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे दैनंदिन कारभारातही लक्ष घालू शकत नसल्याने राज्याचे अतोनात नुकसान होत आहे.

दीर्घकाळ अनुपस्थित असल्यास पदभार अन्य ज्येष्ठ सहकाऱ्याकडे सोपविण्याची प्रथा अमलात आणण्याची हीच ती वेळ असून आता राज्याला अधिक अस्थिरतेकडे ढकलण्याऐवजी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हस्तांतरित करून ठाकरे यांनी राज्यकारभारात स्थैर्य आणावे, अशी मागणी भांडारी यांनी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यात जनता असंख्य समस्यांचा सामना करत असताना मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर देखील पडू शकत नाहीत, व मंत्रालयापर्यंत जाणेही त्यांना शक्य होत नाही. विधिमंडळाच्या अधिवेशनासही ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे सरकार दिशाहीन व निर्नायकी झाले आहे

कोरोनास्थितीचा आढावा घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता.13 जानेवारी) निमंत्रित केलेल्या महत्वपूर्ण दूरसंवाद बैठकीसही ते प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. सलग अडीच तास बसणेदेखील त्यांना शक्य नाही, अशी कबुली राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीच दिल्याने ठाकरे यांनी पूर्ण विश्रांती घेऊन ठणठणीत बरे व्हावे, अशा सदिच्छाही त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT