Health Minister Rajesh Tope
Health Minister Rajesh Tope Sarkarnama
राज्य

राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरु होणार?

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील कोरोना (Covid-19) प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याने रुग्णसंख्याही कमी होतांना दिसत आहे. यामुळे राज्यातील शाळांचे सर्व वर्ग सुरू करण्याबाबत हालचालींना वेग येत आहे. आजघडीला ग्रामीण भागांतील पाचवी ते बारावी आणि शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. आता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्गही सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत राज्याच्या 'चाईल्ड टास्क फोर्सनेही' परवानगी दिली असल्याची माहीती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

राजेश टोपे म्हणाले, "चाईल्ड टास्क फोर्सच्या म्हणण्यानुसार पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांमार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र, 12 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शाळा, कॅालेजमध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. याबरोबरच, पहिली ते चौथी वर्ग सर्व अटीशर्थींसह सुरु करण्याची परवानगी देण्याची सूचना त्यांनी केली आहे. याबाबत विचार सुरु असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहांना 50 टक्के आसन क्षमतेची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना प्रसार नियत्रंणात आला तर, आणखी निर्बंध कमी करण्यात येतील. तसेच, कोरोना जरी कमी झाला असला तरी गर्दी व कोरोना नियमाचे पालन करणे अजूनही गरजेचे आहे. याबाबत दाखले देतांना टोपे म्हणाले की, सध्या जर्मनी, ऑस्ट्रिया, अमेरिकेमध्ये डेल्टा व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत आहे. पुढच्याला ठेच मागचा सावध या युक्तिप्रमाणे बेफिकीर राहून चालणार नाही, असे टोपे यांनी सांगितले.

देशात मोठ्याप्रमाणात कोव्हॅक्सिन लसी उपलब्ध आहेत. ही लस मुलांना देण्यात कोणतीही अडचण नाही असे तज्ञ्जांचे मत आहे. मात्र, याबाबत एकदा का केंद्र सरकारने लसीकरणाबाबत परवानगी दिली तर, राज्याची तयारी आहे. राज्यात दररोज सुमारे 700 ते 800 रुग्ण आढळत आहेत. राज्याचा पुनर्प्राप्ती दर 98 टक्के आहे. तर मुलांमध्ये गंभीर आजाराचे प्रमाणही फारसे नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही.याबरोबरच राज्यात डेल्टा व्हेरिएंटऐवजी दुसरा नवा व्हेरिएंट तपासणीमध्ये आढळलेला नाही. तज्ज्ञांनी सांगितले की, तिसऱ्या लाटेची शक्यता जरी असली तरी, तीव्रता कमी असेल. मात्र, कोरोनाचे नियम तंतोतंत पाळणे व 100 टक्के लसीकरण करणे या दोन गोष्टी पुढच्या काळातही कराव्या लागतील, असे टोपे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT