मुंबई : उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) विरोधी पक्ष भाजपकडून (BJP) महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) घेरण्याच्या प्रयत्न केला जाणार याचे संकेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज (ता.2 मार्च) घेतलेल्या पत्रकार परिषदेमधून मिळाले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांचे तोडले जाणारे वीज कनेक्शन, ऊस गाळपाचा प्रश्न, मराठा (Maratha Reservation) व ओबीसी आरक्षणावर न निघालेला तोडगा यावर फडणवीसांनी कडाडून टीका केली याबरोबरच राज्य सराकारच्या वाईन धोरणावर फडणवीस म्हणाले की, सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी बारा बलुतेदारांसाठी घेतला नसून बेवड्यांसाठी घेतला आहे. हे बेवड्यांना समर्पित सरकार असून या अहंकाऱ्यांना महाराष्ट्र झुकवून दाखवेल, असा घणाघात फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
फडणवीस म्हणाले, राज्यातील भ्रष्टाचार चरम सिमेला पोहचला आहे. हे आतापर्यंतचे सर्वाधिक भ्रष्टाचारी सरकार आहे. राज्यातले परिक्षांचे घोटाळे अजून संपलेले नाहीत. या सरकारला एकच घटक जवळचा वाटतो तो म्हणजे दारु उत्पादन करणारा, हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे. बेवड्यांसाठी जेवढे निर्णय या सरकारने घेतले, तेवढे शेतकरी आणि बारा बलुतेदारांसाठी घेतलेले नाहीत. त्यामुळे या सरकारचे काळे कामे आम्ही बाहेर काढू,असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
''मुंबई बॅाम्बस्फोटातील आरोपी दाऊद यांच्याशी संबध असलेल्या नवाब मलिकांच्या पाठिशी हे सरकार उभे राहत आहे. दाऊशी व्यवहार करणाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारे हे सरकार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही मलिकांच्या राजीनाम्यांशी संघर्ष करणार आहोत. उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात आम्ही महत्वाचे मुद्दे मांडणार असून त्या मुद्दांवर चर्चा झाली पाहिजे. अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
ते म्हणाले, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे दोन्हीही महत्वाचे विषय आहे. खासदार संभाजीराजेंना सरकारने तीच आश्वासने दिली आहेत. ओबीसी समाजाच्या महाज्योती संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पैसे दिले जातात ते पैसे देणे बंद झाले आहे. महाज्योती बंद पाडण्याचे काम सरकारचे सुरु आहे. महाज्योतीला निधी मिळावा म्हणून आम्ही संघर्ष करणार आहोत. राज्यातील भ्रष्टाचार चरमसीमेला पोहोचला आहे. लिपिक साहेबांना लाच मागतो अन् कंत्राटदारांकडून बचावासाठी काही अधिकारी बंदुकांची मागणी करतात, अशी भयावह स्थिती राज्यात आहे. आतापर्यंतचे सर्वात भष्ट्राचारी सरकार म्हणून ठाकरे सरकारची नोंद इतिहासात होईल. हे सरकार सावकारी सरकार आहे, असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला.
आम्ही शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. मात्र, आता वीज कनेक्शन तोडले जात आहे, त्यामुळे अजित पवारांच्या शब्दाला आघाडी सरकारमध्ये किंमत राहिलेली नाही, असा टोला देखील फडणवीसांनी पवारांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.