CNG
CNG Sarkarnama
राज्य

गुड न्यूज! राज्यात CNG झाला स्वस्त ; व्हॅट 13.5 वरून 3 टक्क्यांवर

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात (Budget) जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील 'सीएनजी', (CNG) 'पीएनजी' (PNG) सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर आज (ता.1 एप्रिल) पासून 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे. तर महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) 3 रुपये 50 पैशांनी स्वस्त झाला आहे.

आता नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी 60 रुपये प्रति किलो तर पीएनजी 36 रुपये प्रति एससीएम असेल. पवार यांनी राज्य सरकारचा तिसरा अर्थसंकल्प नुकताच विधिमंडळात सादर केला. या अर्थसंकल्पात आरोग्य, शेती, उद्योग या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर सीएनजी तसेच पीएनजीवरील मूल्यवर्धित करही कमी करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे आता सीएनजी आणि पीएनजी स्वस्त: होणार आहे. यामुळे महागाईमध्ये सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, नुकत्याच देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असून मागील चार दिवसांत तीनवेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अलीकडच्या काळात राज्यात पेट्रोल डिझेलवरील कर कमी होण्याची शक्यता कमी झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये अजूनच वाढ होणार असे संकेतही पवारांनी दिले आहे. इंधन महाग होणार म्हणूनच गॅसवरचा कर कमी केला, अशी असेही पवारांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचे उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हापासून राज्यातही कर कमी करण्याची मागणी होत आहे. नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात नैसर्गिक वायूवरील कर 10 टक्क्यानी कमी करण्यात आला. मात्र, पेट्रोल डिझेलवरील करात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT