Devendra Fadnavis and Pankaja Munde
Devendra Fadnavis and Pankaja Munde 

Sarkarnama

राज्य

'गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला घरी पाठवण्याचं पाप केलं म्हणून भाजपची सत्ता गेली'

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्याचे नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी 2014 साली देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र म्हणत तुम्हाला खुर्चीत बसवले पण त्याच गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला तुम्ही घरी पाठवलं, असा घणाघात राष्ट्रवादीचे कॅाग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला. यावेळी विधीमंडळात बसलेल्या भाजप (BJP) नेत्यांची मात्र यामुळे चांगलीच पंचाईत झाली होती. मोहिते हे हिवाळी अधिवेशना दरम्यान विधीमंडळात बोलत होते.

मोहिते म्हणाले, विरोधक फक्त टीका करत आहेत. सत्ता मिळत असेल, तर सर्व पवित्र आणि मिळत नसेल तर सर्वजण अपवित्र, अशी भूमीका विरोधकांची बरोबर नाही. राज्यात अनेक प्रश्न आहेत यातुन आपल्याला बाहेर पडायचे आहे. मात्र, विरोधकाकडून फक्त राजकारण केले जात आहे. मुंबई महापालिकेत इतके दिवस तुम्ही शिवसेने सोबत सत्तेत होतात त्यावर तुम्ही का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. चाकणमध्ये मी मराठा आरक्षणासाठी माझे कर्तव्य म्हणून आंदोलनात सहभागी झालो होतो. मात्र, माझ्यावर एका वर्षानंतर झालेल्या दंगलीचा सुत्रधार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यामध्ये काहीही निष्पण झाले नाही. आज देशात भाजप सरकारकडून मनमानी कारभार केला जात असून वाटेल त्याला जेलमध्ये टाकण्यासाठी ईडी किंवा अन्य चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. देशात मोदींची इतकी दहशत निर्माण झाली की देशाची वाटचाल हूकूमशाहीकडे सरू झाली आहे. त्यामुळे तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल आम्हाला काहीच शिकवू नये, अश्या शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले, "2014 ला या राज्याचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र म्हणत तुम्हाला खुर्चीत बसवलं त्यांच्या मुलीला घरी पाठवण्याच पाप तुम्ही केल कशी तुम्हाला सत्ता मिळेल? ज्यांनी उपकार केले त्यांची जाणीव तुम्ही ठेवली नाही. ज्या एकनाथ खडसेंनी तुम्हाला संधी दिली त्या एकनाथ खडसेंवर सुद्धा तुम्ही मनमानी केली", असा घणाघातही मोहितेंनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर केला.

मोहितेंच्या टीकेवर संतप्त झालेल्या भाजप नेत्यांच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटलांनी अक्षेप घेत दिलीप मोहितेंना थांबवण्याचा प्रयत्न केला व त्यांचे बोलणे कामकाजातून काढून टाकण्याची विनंती अध्यक्षांना केली, यावर अध्यक्षांनी त्यांना विषयावर बोलण्यास सांगितले. यानंतर दिलीप मोहितेंच्या मदतीला मंत्री विजय वडेट्टीवार आले आणि मोहिते हे काहीच चुकीचे बोलले नसल्याचे सांगत ते विरोधात का बसले याचे फक्त कारण मोहितेंनी सांगितले आहे, असे सांगितले. यावेळी आमदार मोहितेंनी आपण काहीत चुकीचे बोललो नसल्याचे सांगत विरोधकांनी सरकारवर जशी टीका केली तेव्हा आम्ही काहीच बोललो नाही. त्यांनीही ऐकून घेण्याची ताकत ठेवावी, असे ठणकावले.

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा 2019 ला विधानसभा निवडणूकीत त्यांचे चुलतबंधू राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडेंनी पराभव केला होता. त्यांच्या या पराभवावर राज्यात अनेकदा चर्चा झाल्या आहेत. त्यांच्या या पराभवामागे फडणवीस यांचा हात असल्याचे अनेकदा पंकजा यांचे कार्यकर्ते व नेते मंडळी सुद्धा बोलले आहेत. भाजप सोडण्याआधी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सुद्धा गोपीनाथ गडावर केलेल्या भाषणात पंकजा यांच्या पराभवावर अप्रत्यपणे फडणवीसांना जबाबदार धरले होते. आता पुन्हा हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार मोहितेंनी हा विषय उकरून काढल्याने ही टीका मात्र भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT