<div class="paragraphs"><p>Tukaram Supe&nbsp;</p></div>

Tukaram Supe 

 

Sarkarnama 

राज्य

टीईटी पेपरफुटी प्रकरणी तुकाराम सुपे अखेर निलंबित

सरकारनामा ब्यूरो

पुणे : शिक्षक पात्रता परिक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या टीईटी (TET) पेपरमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य सरकारने (State Government) राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपेंचे (Tukaram Supe) निलंबन करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडून महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करत सुपेंना अटकेच्या दिवसापासून निलंबित करण्यात आल्याची, माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikewad) यांनी दिली आहे.

सुपेंवर 2019-20 मध्ये झालेल्या टीईटी परिक्षेत गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांना 16 डिसेंबरला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सुपे यांना अटक केल्याच्या दिवसापासून 48 तासांपेक्षा अधिक कालावधी झाला असून ते अद्यापही पोलीस कोठडीतच आहेत.

आदेशात म्हटले की, "हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत तुकाराम सुपे (आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे) यांचे मुख्यालय पुणे येथे राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबित असताना सुपे यांनी खासगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे अनुज्ञेय असणार नाही. निलंबित असताना त्यांनी खासगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास ते गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरतील आणि त्यासाठी कारवाईस पात्र ठरतील." असे आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर, तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी यामध्ये दोषी आढळेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा गायकवाड यांनी दिला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून ही समिती काही दिवसातच चौकशी अहवाल देईल, असे त्यांनी सांगितले आहे.

सुपेंच्या घरी पोलिसांकडून छापे टाकण्यात आले असून यामध्ये आतापर्यंत सुमारे 2 कोटी 88 लाख व सोने सापडले आहे. याप्रकरणी पोलिसांना अजून काही महत्वाची माहिती हाती लागली असून याबाबतचा तपास अजून सुरु आहे. याप्रकरणाची चौकशी ही सीबीआयच्या मार्फत करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी (ता.20 डिसेंबर) मुख्यमंत्र्याकडे केली होती.

टीईटी गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत

टीईटी परिक्षा गैरव्यवहार प्रकरणी सखोल चौकशीसाठी अपर मुख्य सचिव (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये आयुक्त (शिक्षण) पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक) पुणे, संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मुंबई हे सदस्य असतील. तर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहे.

टीईटी परिक्षा तसेच, जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीने केलेल्या कामांमध्ये झालेल्या अनियमिततेची चौकशी करून त्याबाबतचा प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल 15 दिवसांत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सादर करेल. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी जारी करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT