Aadhaar Card Tension Over! Find 60,000 Authorized Centres in One Click, Agreement Signed with Google Sarkarnama
विशेष

Aadhaar Seva Kendra : आधार कार्डचं टेन्शन मिटलं! आता एका क्लिकवर शोधा 60 हजार अधिकृत केंद्र, गुगलसोबत झाला करार

UIDAI आणि Google यांच्यातील करारामुळे आता ६० हजार आधार अधिकृत केंद्रांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध. जवळचे आधार सेवा केंद्र Google Maps वरून सहज शोधा.

Rashmi Mane

आधार कार्डधारकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. UIDAI ने आधार सेवांचा लाभ अधिक सोपा आणि जलद मिळावा यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. आता नागरिकांना त्यांच्या जवळचे अधिकृत आधार केंद्र थेट Google Maps वर सहज शोधता येणार आहे. त्यामुळे चुकीच्या पत्त्यावर भटकंती करण्याची गरज लागणार नाही.

यापूर्वी अनेकांना आधार नोंदणी किंवा दुरुस्ती सेवांसाठी योग्य केंद्र शोधताना अडचणी येत होत्या. काही वेळा अनधिकृत एजंट किंवा फसवे केंद्र यांच्याकडे लोक पोहोचत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होते. आता UIDAI आणि Google यांच्या सहकार्यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. पुढील काही महिन्यांत ही सुविधा सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केली जाणार आहे.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा अधिक सुलभ करणे. Google Maps वर अधिकृत आधार केंद्रांचा अचूक पत्ता, उपलब्ध सेवा, तसेच केंद्र सुरू आणि बंद होण्याची वेळ याची सविस्तर माहिती दिसणार आहे. उदाहरणार्थ, प्रौढ व्यक्तीची नोंदणी, बाल आधार नोंदणी, मोबाईल क्रमांक अपडेट, पत्ता बदल अशा सेवा कोणत्या केंद्रात उपलब्ध आहेत, हे स्पष्टपणे पाहता येईल.

देशभरातील 60 हजारांहून अधिक मान्यताप्राप्त आधार केंद्रांची माहिती या सुविधेत समाविष्ट केली जाणार आहे. यात राज्यस्तरीय आधार सेवा केंद्रांचाही समावेश आहे. त्यामुळे वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार योग्य केंद्र निवडू शकतील. केवळ मोबाईल नंबर अपडेट करायचा असल्यास संबंधित सेवा देणारे केंद्र शोधता येईल. लहान मुलांच्या आधार नोंदणीसाठीही स्वतंत्र सुविधा असलेले केंद्र सहज सापडेल.

Google Maps वर शोध घेताना पत्त्यासोबतच इतर महत्त्वाची माहितीही दिसेल. केंद्रातील सुविधा, दिव्यांगांसाठी सोयी, पार्किंग व्यवस्था, कामकाजाची वेळ अशा तपशीलांमुळे नागरिक आधीच नियोजन करू शकतील. त्यामुळे केंद्रावर गेल्यावर अनावश्यक त्रास होणार नाही. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी सांगितले की, या निर्णयामुळे आधारधारकांचे जीवन अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल. डिजिटल सुविधांचा वापर करून सरकारी सेवा अधिक परिणामकारक करण्याचा हा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT