Minister Abdul Sattar Sarkarnama
विशेष

Minister Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची जीभ नेहमीच का घसरते ? वाद आणि सत्तारांचे जवळचे नाते...

Sachin Waghmare

Political News: अब्दुल सत्तार अन् त्यांची जीभ घसरणे हे एक समीकरणच झाले आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री अशी झाली. मात्र, त्यांची ही वाटचाल अनेक कारणांनी वादग्रस्तच ठरली. एक, दोन महिन्यांनी त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या विषयांनी ते नेहमीच चर्चेत येतात.

कधी त्यांच्या मुलीच्या डीएड प्रवेशावरून तर कधी दसरा मेळाव्याला वेगळेच कारण सांगून मतदारांना मुंबई वारी करायला लावल्याने ते चर्चेत आले होते. बोलताना तारतम्य न बाळगल्याने नेहमीच त्यांची अडचण होते. यामुळे नेहमीच त्यांच्या जीभ घसरण्याची चर्चा होत असते. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील वक्तव्यामुळे त्यांची नाचक्की झाली होती.

वर्षभरापूर्वी म्हणजे 7 नोव्हेंबर 2022 ला सिल्लोडमध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असंसदीय भाषेत खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळेंनी खोके देण्याची ऑफर केली होती. त्यावरून त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असे वक्तव्य केले होते.

त्यासोबतच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख केला होता. यामुळे संपूर्ण राज्यभर सत्तार यांच्या वक्तव्याचा निषेध झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने रान पेटविल्याने त्यांना माफी मागावी लागली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पैठण तालुक्यात 2019 मध्ये दुष्काळ सभेत बोलताना माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची यापूर्वी एकदा जीभ घसरली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे तत्कालीन सभापती हरिभाऊ बागडे यांच्याविषयी बोलताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यावेळी सत्तार यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली होती. विशेषतः हरिभाऊ बागडे यांचे वय पाहून तर त्यांच्यावर टीका करायला हवी होती, अशा शब्दांत काही जणांनी त्यांचे कान पिळले होते.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्याविषयी बोलताना 8 मे 2023 रोजी अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. आमच्या मतांवर राज्यसभेत निवडून गेलेला हा महाकुत्रा आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावेळीही या वक्तव्यावरून अनेकांनी सत्तारांचे शेलक्या शब्दांत वाभाडे काढले होते. त्यानंतरही त्यांच्या बोलण्यात काहीच फरक पडला नाही. त्यानंतरही अनेक वेळा त्यांची जीभ घसरलीच.

28 ऑक्टोबर 2022 रोजी सत्तार बीड जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते कृषिमंत्री होते. दौरा आटोपून बसल्यानंतर एके ठिकाणी चहा घेत असताना बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी, मी चहा पीत नाही, असे म्हटले होते.

त्यावेळेस सत्तार यांनी जिल्हाधिकारी शर्मांना सरळ प्रश्न करीत तुम्ही चहा घेत नाहीत तर दारू पिता का ? असा सवाल केला होता. या वेळी या ठिकाणी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थितीत होते. त्यावेळी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने आंदोलन केले होते.

'या' कारणांमुळे आले अडचणीत

ज्याप्रमाणे ते वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आले, त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत विविध कारनाम्यांनीदेखील चर्चेत राहिले. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास त्यांनी नकार दर्शवत कॅबिनेट मंत्री पदासाठी हट्ट धरला होता. हा हट्ट उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केल्यानंतरच त्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या कथित पथकाने अकोल्यात टाकलेल्या धाडीच्या प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले होते.

कथित कृषी पथकाने टाकलेल्या धाडीदरम्यान या पथकात सहभागी असलेल्यांनी पैशाची मागणी केली असल्याची तक्रार कंपन्यांकडून करण्यात आली आहे. या पथकात सत्तारांच्या पीएचा सहभाग होता. शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे आली होती. राज्य सरकारने ही प्रमाणपत्रे रद्द केली होती.

दसरा मेळाव्यामुळे दुसऱ्यांदा फजिती !

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला हजारो लोक नेले होते. मात्र, त्यावेळेस सत्तार यांनी खोटे बोलून नागरिकांची गर्दी जमा केली असल्याचे पुढे आले होते. यावेळेस दसरा मेळाव्याला मराठा आंदोलकांनी त्यांच्या बस अडविल्याने ते चर्चेत आले होते. मराठा आरक्षणासाठी पेटलेले आंदोलन, त्यातच मंत्री, आमदार, खासदारांना गावबंदीची केलेली घोषणा याचा मोठा फटका अब्दुल सत्तार यांना बसल्याचे दिसून आले.

Edited By - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT