Abhijit Patil-RohitPawar
Abhijit Patil-RohitPawar Sarkarnama
विशेष

आधी पवारांसोबत एकत्र प्रवास; आता अभिजित पाटलांची रोहित पवारांसोबत डिनर डिप्लोमसी!

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूर (Pandharpur) विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्याशी राष्ट्रवादीने अधिक जवळीक साधण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच अभिजीत पाटील यांनी टेेंभूर्णी ते यवतपर्यंत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत गाडीतून प्रवास केला होता. त्यानंतर रविवारी (ता. २५ सप्टेंबर) आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) विठ्ठल कारखान्यावर अभिजीत पाटलांसोबत डिनर डिप्लोमसी करत त्यांना अधिक जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांच्या डिनर डिप्लोमसीनंतर पंढरपूर तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Abhijit Patil's dinner diplomacy with Rohit Pawar)

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसने आतापासूनच विधानसभा मतदारसंघाची चाचपणी सुरु केली आहे. त्यामध्ये पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. आमदार भारत भालके यांच्या आकस्मिक निधनानंतर पंढरपूर विधानसभा मतदार संघ प्रथमच भाजपच्या ताब्यात गेला आहे. तो परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने काॅंग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

पोटनिवडणुकीत विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. यामध्ये भाजपचे समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके यांचा अवघ्या तीन हजार सातशे मतांनी पराभव केला. त्यानंतर झालेल्या विठ्ठलच्या निवडणुकीतही राजकारणातील नवख्या अभिजीत पाटील यांनी भगीरथ भालके व कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांचा दारुण पराभव केला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीने नव्या नेतृत्वाचा शोध सुरु केला आहे. त्यातच विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची मागील काही दिवसांपासून जवळीक अधिकच वाढली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आठ दिवसांपूर्वी कुर्डूवाडी येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी विठ्ठलचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे व्यासपीठावर पहिले रांगेत उपस्थित होते. कार्यक्रमानंतर टेंभूर्णी ते यवतपर्यंत अभिजीत पाटील यांनी शरद पवारांच्या गाडीतून सोबत प्रवास केला. प्रवासादरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसह पक्ष संघटनेवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर रविवारी (ता. २५ सप्टेंबर) सोलापूरचे राष्ट्रवादीचे प्रभारी आमदार रोहित पवार हे पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, भगिरथ भालके, कल्याणराव काळे हे मात्र अनुपस्थितीत होते. भालके-काळे यांच्या अनुपस्थितीची सध्या तालुक्याच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांच्या कार्यक्रमालाही भगीरथ भालके गैरहजर होते.

देव दर्शनानंतर रोहित पवार यांनी विठ्ठल कारखान्यावर जाऊन अभिजीत पाटील यांच्यासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. भोजनानंतर कारखाना कार्यस्थळावर रोहित पवार आणि अभिजीत पाटील यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. यामध्ये कारखान्याच्या अडीअडचणीसह राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा केल्याची माहिती आहे. आगामी काळात अभिजीत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अभिजीत पाटील कोणती भूमिका घेतात यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. सध्यातरी पाटील हे सत्ताधाऱ्यांसह विरोधी नेत्यांसोबत समान अंतर ठेवून आहेत. ऐन वेळी ते कोणती राजकीय भूमिका घेतात, याकडे पंढरपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT