Aditya Thackeray  Sarkarnama
विशेष

Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंचं दसऱ्या मेळाव्यातील पहिलं भाषणं का ठरलं लक्षवेधी; नेमकं काय म्हणाले ?

Sachin Waghmare

Mumbai News : मुंबईतील शिवाजी पार्कवर शनिवारी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा उत्साही वातावरणात पार पडला. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच युवा नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

अनुभवी असलेल्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारच्या काळात झालेला भ्रष्टचाराच्या प्रकरणाचा पाढा वाचत जोरदार टीका केली. त्यामुळे त्यांचे पहिले भाषण लक्षवेधी तर ठरलेच त्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत व खिल्ली उडवत उपस्थितांचे मने जिंकली. (Aditya Thackeray News)

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरुन बोलताना त्यांनी सत्ताधारी नेत्यावर निशाणा साधला. त्यासोबतच यावेळी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच काही लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला. दसरा मेळाव्यात पहिल्यांदा भाषण करत असलो तरी लहानपणापासून आमच्यासाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे दसऱ्याचा असायचा, यादिवशी आजाचं भाषण असायचं, तेव्हा आम्ही मैदानात बसून भाषण ऐकत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिंदे यांची केली मिमिक्री

गेल्या अडीच वर्षांच्या काळात आणि म्हणोन... आणि म्हणोन... शर्ट खाली खेचत कोणीतरी भाषण करते असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. एकनाथ शिंदे यांनी, '...आणि म्हणोन, आणि म्हणोन...' बोलत राज्यात धार्मिक आणि जातीय दंगली करत लोकांना व्यग्र ठेवले. हे सरकार रोज खोके खात आहे, भ्रष्टाचार करत आहे. मुंबईत 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा झाला आहे.

मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो की, या प्रकल्पाच्या फाईलवर सही करु नका. अन्यथा एका महिन्यात आमचं सरकार येत आहे. तुम्हाला आत राहायचं आहे की बाहेर राहायचं आहे, हे तुम्हीच ठरवा, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केला. शिंदे सरकार जेव्हा दावोसला गेले तेव्हा चार दिवसांत 45 कोटी रुपये उडवून आले. आम्ही दाव्होस आर्थिक परिषदेला गेलो होतो तेव्हा महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

निवडणुकीबाबत गंभीर आरोप

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला. हे सरकार सध्या हजारो निर्णय घेत आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार निर्णय घ्यायला घाई करत आहे. पण मला एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत अदानीचे सर्व जीआर निघणार नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

15 ते 20 मिनिटांच्या ओघवत्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर अनेक आरोप करीत अनेक कामात झालेला भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आणला. नुकत्याच झालेल्या सिनेटच्या निवडणुकीस राज्य सरकरकडून दोन वर्षांपासून अडचणी आणल्या जात होत्या. नेहमीच या ना त्या कारणाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या. मात्र, कोर्टाच्या निर्णयाने ज्यावेळेस निवडणूका झाल्या त्यावेळी घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे येणाऱ्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच असल्याचे सांगून जोरदार तयारी करण्यास सांगत उपस्थित नेतेमंडळी व कार्यकर्त्याचे मनोबल उंचावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT