Vikhe Thorat alliance Sarkarnama
विशेष

Ahilyanagar DCC Bank : 57 वर्षांपूर्वी जुळलेले विखे-थोरातांचे सूर पुन्हा जुळले; सुजय विखेंच्या सत्तेला थोरातांच्या जावयाची साथ!

After 57 years, Vikhe and Thorat political families reunite in Ahilyanagar District Bank. BJP Sujay Vikhe becomes chairman, while Congress Ranjitsinh Deshmukh elected vice-chairman. What role will NCP SP Nilesh Lanke play? 1969 मध्ये विठ्ठलराव विखे पाटील अध्यक्ष, तर भाऊसाहेब थोरात होते उपाध्यक्ष; तब्बल 57 वर्षांनंतर जिल्हा बँकेत इतिहासाची पुनरावृत्ती, खासदार लंके यांच्या भूमिकेकडे लक्ष!

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Bank : अकोले तालुक्यातील रतनगडावर उगम पावणारी प्रवरा नदी संगमनेरमार्गे प्रवरानगरकडे वाहत जाते. मात्र, संगमनेरमध्ये प्रवरेतून म्हाळुंगी नदीचा स्वतंत्र प्रवाह निर्माण झाला. पुढे या दोन्ही नद्यांचा प्रवास स्वतंत्र राहिला. काहीशी अशीच राजकीय वाटचाल प्रवराकाठच्या प्रवरानगरची आणि म्हाळुंगीच्या काठावरील संगमनेरचीही राहिली.

विखे पाटील आणि थोरात या दोन राजकीय घराण्यांमधील संघर्षाने जिल्ह्याचे राजकारण अनेक वर्षे ढवळून निघाले. मात्र, आता तब्बल 57 वर्षांनंतर या दोन प्रवाहांचे राजकीय सूर पुन्हा जुळले आहेत.

प्रवराकाठच्या सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे पणतू डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) आणि म्हाळुंगीच्या काठावरील संगमनेरचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब थोरात यांचे नातजावई रणजितसिंह देशमुख आता अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचा कारभार एकत्रितपणे सांभाळणार आहेत. बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, तर उपाध्यक्षपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात विखे-थोरात यांच्यातील नव्या सहमती पर्वाची सुरुवात झाली आहे.

1969 मध्येही विखे अध्यक्ष, थोरात उपाध्यक्ष!

या नव्या राजकीय समीकरणाला मोठा ऐतिहासिक संदर्भ आहे. 1969 मध्ये तत्कालीन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) अध्यक्षपदी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होते, तर भाऊसाहेब थोरात उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी बँकेची धुरा सांभाळली होती. त्यावेळी विखे पाटील आणि थोरात या दोन घराण्यांमध्ये सहकाराच्या माध्यमातून समन्वय होता.

विखे-थोरातांमध्ये टोकाचे वैर

मात्र, पुढील पिढ्यांमध्ये या दोन्ही परिवारांचे राजकीय सूर जुळले नाहीत. उलट, राजकीय संघर्षाचे रूपांतर अनेकदा टोकाच्या वैरात झाले. स्थानिक राजकारणापासून जिल्ह्याच्या सत्ताकारणापर्यंत या संघर्षाचे पडसाद उमटत राहिले. एक काळ असा होता की, विखे पाटील विरुद्ध थोरात आणि त्यांच्यासोबत उर्वरित जिल्हा, असे राजकीय चित्र निर्माण झाले होते.

लोकसभेचा बदला विधानसभेत; संघर्ष शिगेला

विखे-थोरात संघर्षाचा अलीकडील टप्पा 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रकर्षाने दिसून आला. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी खासदार नीलेश लंके यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

थोरात यांना पराभवाचा धक्का

लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरमध्ये राजकीय चित्र पालटले. विखे पाटील यांच्या रणनीतीला यश मिळाले आणि सलग आठ टर्म आमदार राहिलेले बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे दोन्ही घराण्यांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत होती.

थोरातांनी घेतली मवाळ भूमिका

यंदाच्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीने राजकीय समीकरणांना वेगळे वळण दिले. यापूर्वी विखे पाटील विरुद्ध इतर असे चित्र दिसत असताना यंदा थोरात विरुद्ध इतर अशी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जिल्हा बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार असल्याने बँकेचे हित जपण्याला प्राधान्य देण्याची भूमिका पुढे आली.

'सहमती'साठी गडाखांची भूमिका निर्णायक

मावळत्या संचालक मंडळातील फाटाफूट, अवास्तव खर्च, नोकरभरतीची चौकशी आणि बँकेसमोरील अन्य आव्हाने या पार्श्वभूमीवर बँकेला राजकीय संघर्षापासून दूर ठेवण्याची गरज व्यक्त होत होती. त्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी काहीशी मवाळ भूमिका घेत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या माध्यमातून सकारात्मक पुढाकार घेतला.

बिनविरोधाच्या प्रक्रियेत अध्यक्षपदाचा शब्द

राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून निवडणूक बिनविरोध करण्याचा आग्रह धरण्यात आला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रक्रियेत सक्रिय भूमिका घेत अध्यक्षपदाबाबत शब्द घेतला. तो बाळासाहेब थोरात यांनी मान्य केला. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि निवडणुकीचे चित्र बदलत गेले.

21 पैकी 17 जागांवर विखे-थोरात गटाचे वर्चस्व

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या. त्यापैकी दहा जागांवर विखे-थोरात समर्थकांना यश मिळाले. उर्वरित दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विखे-थोरात गटाने सात जागा जिंकल्या. त्यामुळे या दोन्ही गटांच्या एकत्रित ताकदीने 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवला. निवडून आलेल्या एका स्वतंत्र संचालकानेही त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे दोन समर्थकही या समीकरणात सहभागी झाले. त्यामुळे 20 संचालकांच्या पाठबळावर डॉ. सुजय विखे पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली.

पणजोबांनंतर 57 वर्षांनी सुजय अध्यक्ष

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षपदाला विखे परिवाराच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व आहे. त्यांचे पणजोबा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी 1969 मध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर त्यांचे वडील आणि विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2006-07 या काळात बँकेचे अध्यक्षपद सांभाळले. आता पणजोबांनंतर तब्बल 57 वर्षांनी आणि वडिलांनंतर 19 वर्षांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना बँकेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

बाळासाहेब थोरातांचे जावई उपाध्यक्ष

दुसरीकडे, उपाध्यक्षपदी निवड झालेले रणजितसिंह देशमुख हे महानंद दूध संस्थेचे माजी अध्यक्ष असून, बाळासाहेब थोरात यांचे जावई आणि भाऊसाहेब थोरात यांचे नातजावई आहेत. त्यामुळे 1969 मधील विखे-थोरात नेतृत्वाची आठवण करून देणारी नवी जोडी जिल्हा बँकेत आकाराला आली आहे.

फडणवीसांचा हिरवा झेंडा

विखे-थोरात यांच्यातील नव्या सहमतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही हिरवा झेंडा मिळाल्याचे राजकीय चित्र आहे. मात्र, या समीकरणासमोर खासदार नीलेश लंके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. कट्टर शरद पवार समर्थक म्हणून ओळखले जाणारे लंके हे बाळासाहेब थोरात यांना आपले नेते मानतात. त्यामुळे जिल्हा बँकेतील नव्या सत्तासमीकरणात ते कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खासदार लंके काय भूमिका घेणार?

एकीकडे विखे-थोरात सहमती एक्स्प्रेसने जिल्हा बँकेच्या सत्तेचा प्रवास सुरू केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके या प्रवासात सहभागी होणार की विरोधाची भूमिका घेणार, हा प्रश्न कायम आहे. बँकेच्या कारभारात नव्या अध्यक्षांना त्यांचा पावलोपावली विरोध होणार की थोरात आणि फडणवीस यांच्या मध्यस्थीने तेही या सहमतीच्या प्रवाहात सहभागी होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. प्रवरा आणि म्हाळुंगी या नद्यांचे प्रवाह स्वतंत्र राहिले; मात्र त्यांच्या काठावरील राजकीय प्रवाह आता एकत्र आले आहेत. ही सहमती केवळ सत्तेपुरती मर्यादित राहते की जिल्ह्याच्या सहकार आणि विकासाला नवी दिशा देते, यावरच या नव्या राजकीय पर्वाचे यश अवलंबून असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT