Yashwantrao Gadakh, Rajiv Gandhi , Balasaheb Vikhe Patil
Yashwantrao Gadakh, Rajiv Gandhi , Balasaheb Vikhe Patil Sarkarnama
विशेष

Ahmednagar Political News: "गडाखजी को ही लडना होगा"; राजीव गांधींचा आदेश

सरकारनामा ब्युरो

प्रकाश पाटील

Balasaheb Vikhe Patil Vs Yashwantrao Gadakh News : 1991 ची लोकसभा निवडणूक नगरकरांच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठरली होती. त्यावेळी देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते. तर शरद पवार हे मगाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यावेळी अहमदनगर दक्षिण आणि कोपरगाव हे दोन मतदारसंघ होते. यापैकी दक्षिण मतदारसंघाची नेहमीच चर्चा होत आली आहे. कोपरगावमधून बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) वारंवार निवडून येत होते. त्यावेळी त्यांना तिकीट नाकारले जाईल, अशी दिल्लीत चर्चा होती.

विश्वनाथ प्रतापसिंह व राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या संघर्षामध्ये विखे पाटील हे व्ही. पी. सिंह यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र होते. त्यामुळे काँग्रेस श्रेष्ठी विखेंचे तिकीट नाकारू पाहत होते. तर विखे पाटील दक्षिण मतदारसंघातून उभे राहणार, अशी चर्चा सुरू झाली होती. दिल्लीत तिकीट वाटपाविषयी एक धोरणात्मक निर्णय झाला होता. 1989 च्या सर्व खासदारांना तिकीट द्यायचे हा तो निर्णय होता. मात्र, देशातून फक्त तीन तिकीटे कापली. त्यामध्ये एक विखेंचं तिकीट होतं. त्यामुळे विखे दक्षिणेतून काँग्रेस उमेदवाराविरोधात बंड करून अपक्ष लढणार, अशा चर्चेने जोर धरला होता आणि पुढे झालेही तसेच.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या निवडणुकीत विखे पाटलांच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झालेले खासदार होते, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh). खरंतर विखे पाटलांच्या विरोधात लढण्याची गडाख यांची इच्छा नव्हती. तसा फोनही त्यांनी विखे पाटलांना केला होता. ते म्हणाले होते, "तुम्ही काँग्रेस सोडू नका. जिल्हा व पक्ष यांच्यासाठी हे बरोबर नाही, वाटले तर मी थांबतो." हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे बालेकिल्ले होते. तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव निलंगेकर यांच्याशी तसे गडाख बोलले होते. निलंगेकर यांनी त्यांची भूमिका हायकमांडकडे पोहचविली. शेवटी हे प्रकरण राजीव गांधीपर्यंत गेले. त्यावर "गडाखजी को ही लडना होगा’" हे राजीव गांधी यांचे उद्गार होते. शेवटी गडाख यांची उमेदवारी जाहीर झाली.

विखे पाटील हे कोपरगाव सोडून दक्षिणेत येणार हे देखील पक्के झाले. जनता दलातर्फे बॅ. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. या निवडणुकीनंतर कायदेशीर प्रक्रिया, न्यायालयीन लढाई, रद्द झालेली खासदारकी, मतदानाचा सहा वर्षांसाठी काढून घेतलेला हक्क याविषयीच्या आठवणींना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी 'अर्धविराम' या आपल्या पुस्तकात उजाळा दिला आहे. गडाख म्हणतात, "या निवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझ्या मतदारसंघात जास्तीत जास्त सभा घेऊन माझे बळ वाढविले. मित्र म्हणून आधार दिला. मोलाची मदत केली. राजीव गांधी यांची सभा नगरला झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील होतो. त्यांची बीडला सभा होती. तेथे मी त्यांना भेटलो होतो. मी त्यांना हार घातला. मी म्हणालो, 'मुझे बात करनी है !' ते म्हणाले, 'बोलिए गडाखजी.' मी म्हणालो, 'आप नगर आईए फाईट बहोत टफ है!' ते उच्चारले, 'मुझे मालूम है. मेरे नेक्स्ट प्रोग्राम में नगर ॲड करो. किसी भी हालत में यह सीट आनी चाहिए," असे त्यांनी शरद पवारांना सांगितले.

ही त्यांची शेवटची आठवण. त्यानंतर तीन-चार दिवसांतच राजीव गांधींची (Rajiv Gandhi) हत्या तमिळनाडूत झाली. त्यांच्या हत्येनंतर निवडणूक लांबली. त्यादरम्यान गांधी यांचा अस्थिकलश मतदारसंघातून फिरवण्याची कल्पना सुचली. पुढे आरोप-प्रत्यारोप झाले. प्रचार शिगेला पोहोचला. मतदान झाले. नगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये मतमोजणी होती. मी माझ्या घरात होतो. पत्नी, मुले तणावात होती. मी मनाने स्थिर होतो. तेवढ्यात तणावाचा भंग करणारा तो शेवटचा व पहिला फोन आला. "साहेब, तुम्ही निवडून आलात...!" जल्लोष, मिरवणूक काढली गेली. त्यानंतर सुरू झालं न्यायालयीन पर्व. निवडणुकीत गैरमार्गाचा अवलंब केला म्हणून विखे पाटील यांनी माझ्यावर खटला गुदरला.

महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर गाजलेल्या विखे पाटील-गडाख खटल्यास सुरवात झाली. "माझं काय व्हायचे असेल ते होऊ द्या, पवारसाहेबांना या केसमध्ये काही होता कामा नये, अशी मी प्रार्थना करीत होतो." शेवटी न्यायालयाने गडाख यांची खासदारकी रद्द करून विखे पाटील निवडून आल्याचे निकालपत्र दिले. पवारांवरही ताशेरे कोर्टाने ओढले. पुढे या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील केले गेले.

सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या निर्णयातले सर्व मुद्दे रद्द ठरवले. मात्र, बॅ. बी. जी. कोळसे पाटील यांनी अहमदनगर दक्षिण मतदार (Ahmednagar Lok Sabha) संघाऐवजी बीडमध्ये जावे यासाठी विखे पाटलांनी त्यांना वीस लाख रूपये दिले, हा माझ्या भाषणातील आरोप वजा भाग करप्ट प्रॅक्टिसेस ठरवला. न्यायालयाच्या निर्णयानुसार मला निवडणुकीसाठी सहा वर्षे अपात्र ठरवले गेले. शरद पवारांना न्यायालयांने निर्दोष ठरवले. याचा मला मनस्वी आनंद झाला. पुढे निवडणूक आयोगाकडे ही केस गेली. आयुक्त टी. एन. शेषन यांनी सहाऐवजी चार वर्षांचा अपात्रतेचा निर्णय दिला. तो मोठा दिलासा होता.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT