Anil Deshmukh- Parambir Singh Sarkarnama
विशेष

ईडीचा आक्रमक युक्तिवाद : अनिल देशमुख हेच मास्टरमाइंड

ईडीचा (Enforcement directorate) Anil Deshmukh यांच्या जामीनाला विरोध

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : खंडणीवसुलीच्या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हेच मास्टरमाईंड आहेत, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई उच्च न्यायालयात आज (ता. ७) प्रतिज्ञापत्राद्वारे केला. (ED opposes bail application of Anil Deshmukh)

‘ईडी’ने देशमुख यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप केले असून या प्रकरणात देशमुख हेच मुख्य सूत्रधार आहेत, असा दावा केला आहे. देशमुख यांनी पदाचा गैरवापर केला आणि पोलिस बदल्यांमध्ये हितसंबंध राखले, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ‘ईडी’च्या सहायक संचालक तासिन सुलतान यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. देशमुख यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेल्या याचिकेवर ‘ईडी’ने ही भूमिका मांडली.

देशमुख यांच्या याचिकेत तथ्य नसून ते प्रभावशाली नेते आहेत. त्यामुळे जामीन मिळाल्यास ते साक्षी-पुरावे प्रभावित करू शकतात, असे ‘ईडी’ने म्हटले आहे. देशमुख यांनी मुलगा हृषिकेश, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, संजय पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या मदतीने संपूर्ण कटकारस्थान रचले. हॉटेल व बारचालकांकडून खंडणी वसूल करणे, हे त्यांनी आखलेल्या कटाचा भाग आहे, असा दावा ईडीने केला. न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्यापुढे उद्या (ता. ८) पुढील सुनावणी होणार आहे. सध्या देशमुख सीबीआय कोठडीत आहेत.

‘ईडी’ने न्यायालयात काय म्हटले?
देशमुख यांच्या मालमत्तेचे हिशेब ते देऊ शकलेले नाहीत. त्यांनी पोलिसांच्या बदल्यांबाबतची एक यादी तत्कालीन सचिव सीताराम कुंटे यांना दिली होती, अशी माहिती कुंटे यांनीच दिली आहे. तसेच एक मंत्रीदेखील त्यांच्या संपर्कात होता. देशमुख यांच्या ‘ज्ञानेश्वरी’ निवासस्थानी वाझे अनेकदा खंडणी वसुलीबाबत येऊन गेला आहे. तसेच त्यांच्या श्री साई शिक्षण संस्थेमध्ये हा पैसा वळवला असून सध्या तपास महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर केल्यास खटला प्रभावित होऊ शकतो, असा दावा ईडीच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT