prauthviraj chvahan, ajit pawar, chndrshekhar bawnkule  Sarkarnama
विशेष

Chandrashekhar Bawankule :पृथ्वीराज 'बाबा' नव्हे तर अजितदादा लागले गळाला; काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी

Sachin Waghmare

Chandrashekhar Bawankule : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये फक्त एकच बाबा अतुलबाबा इतर कोणत्याही 'बाबा'ला प्रवेश नाही, अशी कोपरखळी वर्षभरापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मारली होती. त्यानंतर या वर्षभराच्या कारकिर्दीत भाजपने पृथ्वीराज चव्हाण यांना जवळ न करता काँग्रेसमधील काही आमदार गळाला लागतील का याची चाचपणी केली. त्यानंतर पृथ्वीराज 'बाबा'ना भाजपमध्ये न घेता अजितदादा पवार यांच्यासह ४० आमदारांना महायुतीमध्ये प्रवेश देत राज्य सरकारमध्ये सहभागी करून घेतले. हा चमत्कार मात्र त्यांच्या पक्षाने करून दाखविला.

वर्षभरापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भाजपमध्ये येणार अशी चर्चा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात रंगली होती, असा उल्लेख भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी कराड तालुक्यातील नांदगाव येथे धनगर समाजाच्या मेळाव्याप्रसंगीच्या भाषणात केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमध्ये फक्त एकच बाबा अतुलबाबा इतर कोणत्याही 'बाबा'ला प्रवेश नाही, अशी कोपरखळी मारली होती. मात्र, या प्रकारानंतर वर्षभराच्या कालावधीत बरेच पाणी पुलाखालून गेले आहे.

काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी

सुमारे दीड वर्षभरापूर्वी शिवसेनेला धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार व १३ खासदार भाजपने फोडत राज्यात सत्ता स्थापन केली होती. मात्र, एवढे करूनही जनाधार मात्र ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंचा बाजूने असल्याचे पाहून आणखी काही आमदार फोडण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू होते. त्यासाठी सुरुवातीला काँग्रेसचे काही आमदार गळाला लागतील की यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र काँग्रेसकडून फारसा प्रतिसाद त्यांना मिळाला नाही. त्यामुळे भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न करण्यात आले.

भाजपचा दुसरा प्लॅनही सक्सेस

भाजपकडून मराठा चेहरा म्हणून अजित पवार यांना सोबत घेण्याचे ठरले होते. त्यानुसार रणनीती आखण्यात आली. भाजपच्या प्लॅनला यश आले आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांच्यासह ४० आमदार महायुती सरकारमध्ये सहभागी झाली. त्यामुळे अजित पावर यांच्यासह ९ जणांचा राज्यमंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यामुळे भाजपचा दुसरा प्लॅनही सक्सेस झाला.

केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा

गेल्या काही दिवसापासून भाजपने केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा पाठीमागे लावून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगितले जात आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणाचा वापर करीत अनेक जणांना गळाला लावले आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी काही बडे मासे भाजपच्या गळाला लागली तर आश्चर्य वाटायला नको.

SCROLL FOR NEXT