Ajit Pawar & other Leaders Sarkarnama
विशेष

Ajit Pawar Group News : अजित पवारांना अर्थ, तर वळसे पाटलांना कृषी मंत्रालय?; इतर सात जणांना मिळणार ‘ही’ खाती...?

मंत्रीपदाची शपथ घेतलेले बहुतांश आमदार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये, तसेच महाविकास आघाडीतही महत्वाची पदे भूषविली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politic's : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून शिवसेना-भाजपसोबत गेलेले अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आहे. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता खातेवाटपाची उत्सुकता असून अजित पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालय येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच, महसूल खात्याचीही चर्चा आहे. (Ajit Pawar likely to get finance or revenue minister post)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) खिंडार पाडले आहे. अजितदादांसोबत ३५ ते ४० आमदार असल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनाही मंत्रिपदे मिळविली आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतलेले बहुतांश आमदार हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये, तसेच महाविकास आघाडीतही महत्वाची पदे भूषविली आहेत, त्यामुळे या मंत्र्यांच्या लौकीकानुसारच त्यांनी मंत्रालये सोपवावी लागणार आहेत. त्याचा तिढा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सोडवावा लागणार आहे.

दरम्यान, युती सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार यांना अर्थ किंवा महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अर्थमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दादांना कोणते खाते मिळते, याकडे राष्ट्रवादीप्रमाणेच महाराष्ट्रातील जनतेचेही लक्ष लागलेले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याकडे ओबीसी कल्याण आणि बहुजन विकास विभाग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.

शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटीलही (Dilip Walse Patil) अजितदादांच्या गोटात सामील झाले आहेत. त्यांच्याकडे कृषी आणि सांस्कृतिक विभाग येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे अल्पसंख्याक कल्याण आणि कामगार मंत्रालय येऊ शकते. धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय विभागाचे मंत्रालय मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आदिती तटकरे यांना महिला आणि बालविकास मंत्रालय, तर धर्मरावबाबा आत्राम यांना आदिवासी विकास हे मंत्रालय मिळू शकते. संजय बनसोडे यांना क्रीडा आणि युवक कल्याण, तर अनिल भाईदास पाटील यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची धुरा येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT