Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Ajit Pawar News : अजित पवारांसमोर 'कसौटी जिंदगी की!

Ncp Political News : अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या विरोधात चांगलेच तोंडसुख घेतले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी अजित पवार यांना महायुतीतील अनेकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. यानंतर उमेदवारीवर पाणी सोडावे लागणाऱ्या स्वपक्षातील नेते, प्रमुख कार्यकर्ते यांचीदेखील मनधरणी करावी लागणार आहे. त्यानंतर उरलेल्या शक्तिनिशी दिवसेंदिवस तगड्या होत चाललेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी व अन्य विरोधकांशी टक्कर द्यावी लागणार आहे.

मुळातच अजित पवार यांना महायुतीत घेण्यास एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेसह भाजपातील अनेक नेत्यांनी विरोध केला. यातच लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दणकून पराभव झाला. या सर्व पराभवाचे खापर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षावर फोडण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची कसोटी लागणार आहे.

वर्षभरापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेतली. निवडून आलेल्या 53 आमदरांपैकी 40 आमदारांना सोबत घेवून ''विकासासाठी'' सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्या महायुतीत जाण्याच्या कारणांची चर्चा राज्यातच नाही तर देशभर झाली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या विरोधात चांगलेच तोंडसुख घेतले.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा टोकाचा प्रयत्न झाला. तेवढा त्यांच्या आयुष्यात यापूर्वी कधीही झाला नव्हता. पवारांवर वैयक्तिक हल्लाबोल केल्यानंतर त्याचा महायुतीला फायदा होईल, असे यामागचे गणित असावे. मात्र झाले उलटेच! लोकसभा निवडणुकीत विजयाचा सर्वाधिक स्ट्राईकरेट शरद पवार यांच्या पदरात टाकत जनतेने महायुतीला सणसणीत चपराक दिली.

लोकसभा निवडणुकीच्या काळातच अजित पवार यांना आमदार नीलेश लंके, बजरंग सोनवणे, उत्तम जानकर या नेत्यांनी रामराम ठोकला. कदाचित या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांना सहानुभूती मिळेल, याची खात्री पटल्यानेच त्यांनी अजित पवारांशी फारकत घेतली. असाच कित्ता विधानसभा निवडणुकीला गिरवला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजित पवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुणे, पिंपरी, लोणावळा येथील प्रमुख कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष, पक्षाचे सरचिटणीस राव मोरे आदींनी राजीनामा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार के. पी. पाटील हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल, तसे पक्षातील अस्वस्थ नेते तुतारी फुंकतील, असे विरोधक सांगत आहेत.

'एकाकी’ भुजबळ

अजित पवार यांच्या पक्षातील आक्रमक चेहरा व ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीपासून नाराज आहेत. लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण झाली नाही, त्यामुळे लोकसभेच्या प्रचारापासून ते अंतर ठेवून होते. नंतर राज्यसभेच्या रिक्त जागेसाठीही त्यांचा विचार झाला नाही. तेथे सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. यातच मराठा आरक्षण आंदोलनात मंत्री भुजबळ यांनी थेट विरोध करण्याची भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेने पक्षाची अडचण होत असल्याने पक्ष आणि भुजबळ यांच्यात अंतर पडले आहे.

-लोकसभेतील पराभवाचे खापर डोक्यावर फुटल्याने अजित पवारांची कसोटी

- बालेकिल्ल्यात राजीनामासत्र; अस्वस्थ नेते 'तुतारी' फुंकण्याची चिन्हे

- मराठा आंदोलनाला विरोधामुळे छगन भुजबळ पक्षात एकाकी

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT