Sachin Kalyanshetti
Sachin Kalyanshetti Sarkarnama
विशेष

कल्याणशेट्टी यांच्या रूपाने अक्कलकोटला चौथ्यांदा मिळाली भाजप जिल्हाध्यक्षपदाची संधी

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (जि. सोलापूर) : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सोलापूर (Solapur) जिल्हाध्यक्षपदाची धुरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. कल्याणशेट्टी यांच्या रुपाने अक्कलकोट तालुक्याला चौथ्यांदा सोलापूर जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. अनेक दिग्गजांना डावलून कल्याणशेट्टी यांच्यावर भाजप श्रेष्ठींनी जबाबदारी सोपवली आहे. (Akkalkot got the opportunity of BJP district president for the fourth time)

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आग्रह यामध्ये महत्वाचा ठरला आहे. आता कल्याणशेट्टी यांच्यावर अक्कलकोटबरोबरच सोलापूर जिल्ह्याचीही जबाबदारी आली आहे. यापूर्वी (स्व.) बाबासाहेब तानवडे, शिवशरण दारफळे, बलभीम शिंदे या तिघांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे संभाळली आहे. यातील तानवडे हे आमदारही होते.

बाबासाहेब तानवडे यांनी १९८० ते १९८६ म्हणजे तब्बल सहा वर्षे, शिवशरण दारफळे यांनी १९९० ते १९९२ यादरम्यान, तर बलभीम शिंदे यांनी २००३ ते २००६ या कालावधीत हे पद सांभाळले आहे. या तिघांना त्यावेळी प्रबळ असलेल्या काँग्रेस आणि नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसशी दोन हात पक्ष वाढविण्याचे काम केले होते. विशेष म्हणजे तानवडे हे आमदारही झाले होते. आता कल्याणशेट्टी यांच्यावर आमदारकी सांभाळण्याबरोबरच जिल्ह्यातील आमदारांची संख्या वाढविण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. ते या पदाला कशा पद्धतीने न्याय देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान कल्याणशेट्टी यांचे सर्वांशी स्नेहपूर्ण संबंध तसेच मिळेल ती जबाबदारी पार पाडण्याची क्षमता ही महत्वाची ठरली आहे. कल्याणशेट्टी यांनी आपली राजकीय कारकीर्द हन्नूर गावाच्या सरपंचपदापासून सुरु झाली. त्यानंतर पाच वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवून पक्षाचे विविध ध्येय धोरणे व कामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचवून पक्षाचे लक्ष आपल्यापर्यंत वेधण्यात यशस्वी ठरले. त्यातून त्यांना विधानसभेसाठी २०१९ ची उमेदवारी मिळाली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी आमदारकीही पटकाविली.

राज्यात महविकास आघाडीची सत्ता येऊनही निधी खेचून आणण्यात कल्याणशेट्टी यशस्वी ठरले हेाते. पक्ष देईल ती जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीतही देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर मये या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती, तेथील उमेदवार निवडून आणत त्यांनी ती यशस्वी करून दाखवली होती.

भारतीय जनता पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन, तसेच पक्षसंघटना आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेन. आगामी काळात जिल्ह्यात होणाऱ्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे गड आणखी मजबूत होतील, यासाठी अथक परिश्रम करण्यात येतील. जिल्हातील खासदार व आमदार तसेच सर्व तालुक्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून त्यांच्या सोबतीने जिल्ह्यात भाजपचे एकहाती वर्चस्व निर्माण करण्यात येईल, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाध्यक्ष निवडीनंतर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT