Amit Shah Sarkarnama
विशेष

Amit Shah : अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याने कार्यकर्त्यांमध्ये उभारी!

Maharashtra Vidhan Sabha Eletion : काहीही करून विधानसभा जिंकायचीच असा भाजपचा इरादा आहे.

ब्रीजमोहन पाटील

Amit Shah and Maharashtra Vidhan Sabha Eletion : महाराष्ट्रात एकाच नेत्याच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढविण्यास भाजप प्रतिकूल आहे. सामूहिक जबाबदारी देण्याची तयारीही सुरू आहे. पण उमेदवार निश्चिती व जागावाटपाच्या निर्णयावर अमित शहा, भूपेंद्र यादव यांचे नियंत्रण असणार आहे. काहीही करून विधानसभा जिंकायचीच असा भाजपचा इरादा आहे. पण हे करताना राज्यातील नेत्यांना महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी आहे.

नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूर येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बैठका घेत राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. प्रमुख नेत्यांच्या बैठकीत ‘गटबाजी थांबवून एकजुटीने काम करा’ अशी कानउघाडणी केली. पण लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याचे अपयश पुसून टाका, प्रत्येक बूथवर १० टक्के मतदान वाढावे यासाठी प्रयत्न करा, बूथवरील कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मतदान सकाळी अकराच्या आत करून घेतल्यास आपल्या मतदानाची टक्केवारी वाढते असा सल्ला शहांनी पदाधिकाऱ्यांना देऊन आत्मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न केला.

राज्यात भाजप(BJP) व महायुतीविरोधात कितीही नकारात्मक विषय चर्चिले जात असले तरी कार्यकर्त्यांना मतदान करून घ्या, इतर विषयांवर लक्ष देण्याची गरज नाही असे शहा यांनी सांगत कार्यकर्त्यांचे लक्ष्य ‘बूथ’च असले पाहिजे, याची जाणीव करून दिली.

संकल्प दृढ विजय का... -

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने फडणवीसांच्या हातात नेतृत्व दिले, पण १०५ आमदारांवर समाधान मानावे लागेल. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले. सत्तेवर येण्याच्या घडामोडींनी भाजपविरोधी जनमानस तयार झाले. त्यामुळेच लोकसभेत केवळ नऊ जागा वाट्याला आल्या. १४ खासदारांचा पराभव झाला. ही पराभवाची छाया विधानसभेवर देखील पडली असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. हाच मुद्दा पकडून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ‘संकल्प दृढ विजय का...’ या शीर्षकाखाली पत्रक वाटप करण्यात आले. त्या पत्रकात ‘आता पुन्हा एकदा परीक्षेला सामोरे जायचे’ असे आहे सांगत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात विधानभा लढविल्या जाणार आहेत, असे अधोरेखीत करण्यात आले.

स्थानिक नेत्यांना मान -

पुण्यातील प्रदेश अधिवेशनानंतर अमित शहा(Amit Shah) यांनी कार्यकर्त्यांना ‘तयारीला लागा’ असे आदेश दिले होते. पण त्यानंतर पक्षाकडून कार्यकर्त्यांसाठी कोणतीही जनसंपर्क मोहिम हाती घेण्यात आली नाही. या दौऱ्यातून फारसे हाती न लागल्याने शहांनी दोन दिवसांत विभागवार बैठका घेतल्या. या दौऱ्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक नेतृत्वावर भर देण्यात आला. कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न शहांनी केला आहे.

आरक्षणाच्या वक्तव्यावरून नाराजी -

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण संपविताना ‘फडणवीसांनी गणित लावत बसू नये, अन्यथा सत्ता जाईल’ असा इशारा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी टार्गेट मात्र फडणवीसच होत आहेत. शहा यांनी संभाजीनगरच्या बैठकीत आरक्षणाचा प्रश्‍न फडणवीस हाताळतील व गुर्जर, पटेल यांचे आंदोलन भाजपने जसे हाताळले तशाच पध्दतीने मराठा आरक्षणाचाही प्रश्‍न सोडविला जाईल, असे आश्वासित केले. त्याचे उलट पडसाद मराठवाड्यात उमटत असून पुन्हा एकदा फडणवीसच टीकेचे धनी होत आहेत. त्यावर फडणवीस यांनी ‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर माझ्यामुळे आरक्षण अडकले आहे, असे सांगितले तर मी राजकीय संन्यास घेईन’ असे उत्तर देऊन स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. मराठवाड्यात मिळालेल्या विद्यमान १६ जागा राखणे भाजपला जरांगे फॅक्टरमुळे आव्हानात्मक झालेले असताना, आरक्षणाचा विषय फडणवीसांच्या जबाबदारीवर सोडून देणे महागात पडण्याची शक्यता आहे, अशी कुजबूज भाजपमध्ये आहे.

जागावाटपाचा तिढा -

महायुतीचे जागावाटप व्यवस्थित सुरु आहे असा दावा नेत्यांकडून केला जात आहे. पण शहा यांनी संभाजीनगरात घेतलेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत समाधानकारक चर्चा झाली नाही. भाजपकडून १६० जागांवर दावा केला जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे व अजित पवार यांना केवळ १२८ जागा शिल्लक राहात आहेत. हे दोन्ही पक्ष किमान ८० जागा मिळाव्यात यासाठी आडून बसले आहेत. महायुतीतील घटक पक्षांचा सन्मान ठेवणे हे भाजपपुढील आव्हान आहे.

शहरी मतदारांवर लक्ष -

वर्धा येथील सभेनंतर पुण्यात मेट्रो प्रकल्प व इतर १२ प्रकल्पांचे उद्‍घाटन, भूमिपूजन होणार होते. पण मुसळधार पावसामुळे हा समारंभच पावसात बुडाला. शहरी मतदारांना डोळ्यापुढे ठेवून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पक्षाने मोदींच्या सभा आयोजित केल्या आहेत. ग्रामीण भागात भाजपला फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरी मतदारांना विकास कामाचे आमिष दाखवून मतपेटी भक्कम ठेवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क : ९८८१५९८८१५

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT