Maharashtra Vidhan Sabha News : राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना भाजपने पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार अधिसूचना आजपासून जारी होणार आहे. 22 ऑक्टोबर मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू होणार आहे.
29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने येत्या काळात महिनाभर निवडणुकीची रणधुमाळी सुरु राहणार आहे. दुसरीकडे महायुतीमधील जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या हायकमांडशी दिल्लीत चर्चा झाल्यानंतर जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे.
राज्यातील निवडणुकीची रणधुमाळी महिनाभर सुरु राहणार आहे. मंगळवारी अधिसूचनेनंतर विहित नमुन्यातील उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून सुरू होणार आहे. यासाठी संपूर्ण राज्यभरातील तयारी पूर्ण झाली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत चार नोव्हेंबर असून त्यानंतर राज्यातील अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. शनिवार-रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसाची वेळ मिळत असली तरी चौथा शनिवार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी दाखल करता येत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात अर्ज भरण्यासाठी सहा दिवस मिळणार आहेत. त्यामुळे आता राज्यभरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू होणार आहे.
महायुतीमधील भाजपची (BJP) 99 उमेदवाराची पहिली यादी आल्यानंतर काही मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये नाराजीनाट्य पहायला मिळत आहे. त्यातच पहिल्या यादीत नाव न आल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपचे आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सागर बंगल्यावर धाव घेतली. उमेदवारीबाबत खात्री नसलेल्या भाजपमधील अनेक नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली. त्यात काही विद्यमान आमदाराचा समावेश होता.
मुंबईच्या वर्सोवा मतदारसंघातील भारतीय लव्हेकर, बोरवलीचे आमदार सुनील राणे, खडकवासल्याचे भीमराव तापकीर हे पहिले यादीत नाव नसल्याने पुन्हा संधी द्या, असे साकडे सागर बंगल्यावर येऊन घातले. त्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाची चर्चा करू, असे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले आहे. विदर्भातील दोन विद्यमान आमदारानी उमेदवारी मिळण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतली. त्यासोबतच मावळातील माजी आमदार बाळा भेगडे यांनीही मावळाची जागा भाजपकडे घ्या, अशी मागणी केली तर अंधेरी पूर्वमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मुरजी पटेल यांनी पण फडणवीस यांची भेट घेतली.
कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गणपतराव गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी सोमवारी पडद्याआड अनेक बैठका झाल्या. दुपारी उद्धवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिल्लीत फोन केला आणि चर्चा सुरु झाली. मंगळवारी दुपारी काँग्रेसची ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दिल्ली येथे झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने 96 जागावरील उमेदवार निश्चित केले आहेत. महाविकास आघाडीचा एकत्रितपणे फॉर्म्युला मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. दोघे बसून मंगळवारी हा विषय संपुष्टात येईल, असे सूत्राने सांगितले. आतापर्यंत झालेल्या जागावाटपात काँग्रेस 96, उद्धवसेना 85, शरद पवार गटाच्या वाट्याला 85 जागा आल्या आहेत. 261 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. उरलेल्या 27 जागापैकी विदर्भ, मुंबईतील तीन ते चार जागांवर चर्चा बाकी आहे. त्यामुळे जवळपास एकमत झाल्यात जमा आहे. मात्र, अंतिम निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल, असे दिसते.
दरम्यान चर्चेचे सूत्र दिवसभर खासदार अनिल देसाई यांच्याकडे होती. त्यामुळे देसाई यांनी नरमाईची भाषा केली. दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची उशिरापर्यंत बैठक झाली. रविवार रात्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचॅसही फोनवर संवाद साधला आहे. त्यामुळे आता काँग्रेस व ठाकरे सेनेत एक वाक्यता दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.