Rajan Patil-Babandada Shinde
Rajan Patil-Babandada Shinde Sarkarnama
विशेष

राष्ट्रवादीला मोठा धक्का : बबनदादा शिंदे, राजन पाटलांनी घेतली दिल्लीत फडणवीसांची भेट

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील सत्ताबदलाचा शिवसेनेपाठोपाठ (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा फटका बसताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे (Baban Shinde) आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. या भेटीच्या वेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. भेटीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. (Babandada Shinde, Rajan Patil meet Devendra Fadnavis in Delhi)

आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी दिल्लीत जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणे हे राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का मानला जात आहे. कारण हे दोघेही कट्टर पवारसमर्थक मानले जातात. पण गेल्या काही दिवसांपासून ते पक्षात नाराज होते. त्यांच्या नाराजीची पक्षाकडून दखल न घेतल्याने त्यांनी अखेर दिल्लीत जात संधी साधली आहे.

दरम्यान, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मध्यस्थीने दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीसाठी खासदार निंबाळकर यांनी मोठी भूमिका निभावल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त एका वृतवाहिनीने दिलेले आहे. मात्र, त्याला अधिकृतपणे दुजारो मिळू शकलेला नाही.

राज्यातील सत्ताबदलानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेषतः शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असताना आता भाजपने विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. माढ्यातून आमदार बबन शिंदे हे तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यातून निवडून आलेले ते सर्वात ज्येष्ठ आमदार होते. त्यामुळे त्यांना मंत्रीपद अपेक्षित होते. मात्र, त्यांना डावलून पक्षाने शेजारच्या इंदापूर तालुक्यातील दत्तात्रेय भरणे यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा सोपवली होती, त्यामुळे शिंदे नाराज होते. मात्र, त्यांनी ती नाराजी उघडपणे कधीही बोलून दाखवली नव्हती.

दुसरीकडे, आमदार शिंदे यांना साधारण वर्षभरापूर्वी सक्तवसुली संचनालयाची (ईडी) नोटीस आली होती. त्याचीही पार्श्वभूमीवर या भेटीमागे असू शकते, अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळातून होत आहे. त्या नोटिशीला आमदार शिंदे यांच्याकडून उत्तरही देण्यात आलेले आहे.

आमदार राजन पाटील हे स्वकीयांकडून होणाऱ्या हल्ल्याने बेजार झाले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे जनता दरबाराच्या माध्यमातून राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर जोरदार शाब्दीक हल्ला करत आहेत. त्यामुळे पाटील कुटुंबीय कमालीचे नाराज झाले आहे. स्वतः राजन पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या कानावर घातली. त्यानंतरही उमेश पाटलांकडून टीका होतच आहे. त्यामुळे राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्ट करत नव्या वाटचालीबाबत संकेत दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT