Bacchu Kadu Sarkarnama
विशेष

Bacchu Kadu News : बच्चू कडू यांची अवस्था बिनहत्यारी सैनिकासारखी...

Bacchu Kadu's Minister Post : मोठ्या 'गिफ्ट'च्या प्रतीक्षेत वर्ष सरले....; आता भाजपला आव्हानाची भाषा

अय्यूब कादरी

Maharashtra Political News : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिपदावर पाणी सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटी गाठलेल्या बच्चू कडू यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद देण्याच्या हालचाली गेल्या वर्षी सुरू झाल्या होत्या. त्या अनुषंगाने दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. त्याला एक वर्ष लोटले, मात्र बच्चू कडू यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ अद्यापही पडलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोन कॉलवर गुवाहाटी गाठलेले बच्चू कडू आता भाजपलाच आव्हान देत फिरत आहेत. (Bacchu Kadu is still waiting for a ministerial post even after a year)

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघातील सपन प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४९५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यांच्यासोबत गुवाहाटीला गेल्याचे बक्षीस बच्चू कडू यांना याद्वारे मिळाले होते. मात्र, कडू यांना कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा होती. निधी दिला त्याच महिन्यात (नोव्हेंबर-२०२२) मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती करण्यास मान्यता देत तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सूचना दिली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोठ्या निधीनंतर आता या विभागाच्या निर्मितीच्या आदेशाने आमदार कडू यांना आठवडाभरातच दुसरे मोठे गिफ्ट मिळाले होते. अर्थातच, बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून या निर्णयाचे स्वागत केले होते. त्यांचा आग्रह याच खात्याच्या मंत्रिपदासाठी होता. त्यामुळे आता त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तत्पूर्वी, बच्चू कडू यांनी अमरावती येथे आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करून कडू यांना त्याचे मंत्रिपद द्यावे, अशी मागणी त्या मेळाव्यात करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली होती.

पुढे मात्र परिस्थिती किचकट होत गेली. मंत्रिपदांची संख्या कमी आणि इच्छुक ढीगभर अशी अवस्था झाली. मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कसरत करावी लागली. यात बच्चू कडू यांचा विषय सातत्याने मागे पडत गेला. मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या नाराजीचे जाहीर प्रदर्शन केले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान, बच्चू कडू यांचे आणि भाजप पुरस्कृत आमदार रवी राणा, त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्याशी खडाजंगी झाली. कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले, असा आरोपही आमदार रवी राणा यांनी जाहीरपणे केला होता. त्यानंतर बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर आपल्या पक्षाचा दावा सांगितला.

फडणवीसांच्या एका कॉलवर गुवाहाटीला गेलेल्या कडू यांनी नंतर त्यांच्याकडे पाठ फिरवत मुख्यमंत्री शिंदेंच्या गोटाला जवळ करणे पसंत केले. आता ते सतत मुख्यमंत्री शिंदे यांची पाठराखण करतात. शिंदे यांना बदलले तर परिणाम वाईट होतील, असा इशाराही ते अधूनमधून देतात. शेतमालाला भाव मिळावा, शेतकऱ्यांचे भले व्हावे, यासाठी मध्यंतरी त्यांनी अयोध्या गाठून प्रभू श्रीरामांना साकडे घालत भाजपला चिमटा घेतला होता. महाविकास आघाडी सरकार जाऊन महायुतीचे सरकार आले. या प्रक्रियेत मंत्रिपद गमावलेल्या बच्चू कडू यांची अवस्था बिनहत्यारी सैनिकासारखी झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT