Balasaheb Thackeray 
विशेष

Balasaheb Thackeray Birth Anniversary : घराणेशाहीच्या आरोपानंतर बाळासाहेबांनी थेट राजीनामा दिला अन् दुसऱ्याच दिवशी...

Rajanand More

Balasaheb Thackeray Birth Anniversary News in Marathi : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ‘शिवसेना कुणाची?’ याचा निकाल दिला अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घराणेशाहीच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. त्यावर खासदार संजय राऊतांनीही पलटवार करीत शिंदेंवर निशाणा साधला. पूर्वी अशाच प्रकारच्या पक्षातूनच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी थेट राजीनाम्याचे अस्त्र उपसले होते. असे धाडस आज कोणता नेता करू शकतो का, असा प्रश्न यानिमित्त सर्वसामान्य लोकांना पडल्याशिवाय राहत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Narendra Modi) सर्वच जण घराणेशाहीच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील काही नेत्यांवर टीका करतात. पण बाळासाहेब ठाकरेंवर पक्षातूनच आरोप झाले होते. त्यामुळे हे आरोप त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना (ShivSena) आणि शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे समीकरण सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या (Maharashtra) मनामनांत रुजलं आहे. मग असं काय घडलं की, बाळासाहेबांवर घराणेशाहीचे आरोप झाले आणि त्यांना थेट राजीनामा द्यावा लागला. (Balasaheb Thackeray Birth Anniversary)

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सक्रिय झाले अन्...

80 च्या दशकापर्यंत बाळासाहेबांनी शिवसेनेचा महाराष्ट्रभर विस्तार केला होता. नेते, कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी राहत होती. त्यांच्या पाठबळावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेवर चांगलीच पकड मिळवली होती. दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील दोन तरुण शिवसेना पक्षसंघटनेत सक्रिय झाले होते. राज ठाकरे यांनी 1985 च्या सुमारास पक्षात येत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांची भाषणशैली, हावभाव म्हणजे शिवसेनाप्रमुखांची फोटोकॉपीच अशी चर्चा होऊ लागली. हळूहळू त्यांनी पक्षातील तरुण कार्यकर्त्यांवर पकड निर्माण केली. मग त्यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारीही टाकण्यात आली. याच काळात उद्धव ठाकरेही सक्रिय झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सक्रिय झाले असताना शिवसेनेला निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. 1990 च्या निवडणुकीत पक्ष मागे पडल्याचे पाहून पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफुस सुरू झाली. 1991 मध्ये छगन भुजबळांनी शिवसेनेला रामराम ठोकला. घराणेशाहीच्या मुद्यावरून काही पदाधिकाऱ्यांनी थेट बाळासाहेबांवर निशाणा साधला. माधव देशपांडे यांनी पत्रकारपरिषद घेऊन अनेक आरोप केले. शिवसेनेत सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या देशपांडे यांनीच आरोप केल्याने शिवसेनेतील खदखद समोर आली. ज्या घराणेशाहीविरोधात आपण लढलो, तीच घराणेशाही शिवसेनेत आणली जात असल्याचा घणाघात त्यांनी केला. हे बंड जिव्हारी लागल्याने बाळासाहेबांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र काढले.

बाळासाहेबांनी 'सामना' या मुखपत्रातून 19 जुलैच्या अंकात अग्रलेख लिहिला. ‘जय महाराष्ट्र’ या मथळ्याखाली त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. हा अग्रलेख शिवसैनिकांच्या हाती पडला अन् मुंबईतील वातावरण तापू लागलं. काही तासांतच शिवसैनिकांची गर्दी जमू लागली. बाळासाहेबांची मनधरणी करण्यासाठी नेते, कार्यकर्त्यांनी जोर लावला. अखेर शिवसैनिकांच्या तीव्र भावनांपुढे शिवसेनाप्रमुखांना माघार घ्यावी लागली. दुसऱ्याच दिवशी त्यांनी सभा घेतली आणि त्यात आपली ताकद दाखवून दिली. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे वेगळे असूच शकत नाहीत, हे समीकरण शिवसैनिकांच्या मनावर बिंबवले गेले होते. पक्षाचा रिमोट कंट्रोल आपल्याच हातात असल्याचे दाखवून देत त्यांनी बंड शांत केले. डॅमेज कंट्रोल कसं करावं, हे त्यांनी दाखवून दिलं होतं.

पहिला राजीनामा 1978 मध्ये...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हा पहिला राजीनामा नव्हता. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. हा दारुण पराभव बाळासाहेबांसाठी धक्का होता. त्यामुळे त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष पराभूत झाला तर राजीनामा देईन, असा इशाराच त्यांनी दिला. त्यावेळी बाळासाहेबांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरील रेघ. त्यामुळे शिवसैनिकांनी प्रचारात कसलीही कसर सोडली नाही. पण त्यानंतरही शिवसेनेचा दारुण पराभव झाला. आधीपेक्षाही जागा कमी झाल्याने बाळासाहेब ठाकरे संतापले होते. त्यांनी काही दिवसांत सभा घेतली. या सभेत त्यांनी सर्वांनाच मोठा धक्का दिला. निवडणुकीआधी बोलल्याप्रमाणे त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

बाळासाहेबांचे हे शब्द कानी पडताच शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी सभेतच जोरदार घोषणाबाजी करून बाळासाहेबांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. व्यासपीठावर येऊन त्यांना राजीनामा मागे घेण्यास भाग पाडले. अखेर त्यांनी राजीनामा मागे घेतला. शिवसेनाप्रमुखांच्या या पहिल्या राजीनाम्यापेक्षा दुसरा राजीनामा शिवसेनेची दिशा ठरवणारा होता. शिवसेनाप्रमुखांनी पक्षातील बंड शांत करून आपली ताकद दाखवून दिली होती.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT