BSF at India Bangladesh Border Sarkarnama
विशेष

Bangladesh Violence : बांगलादेशात हाहाकार! यापूर्वीही अनेकदा भारतात घुसखोरी

अय्यूब कादरी

Bangladesh Violence News : बांगलादेशात हाहाकार माजला आहे. नोकऱ्यांतील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरून सुरू झालेल्या हिंसाचारात तीनशे ते चारशे जणांचा बळी गेला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडला आहे.

हिंदू नागरिकांवर हल्ल्याच्या बातम्याही येत आहे. त्यामुळे भारत-बांगलादेश सीमेवर हजारो नागरिक जमा झाले असून, भारतात घुसघोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ही घुसखोऱी रोखली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश धुमसत आहे. बांगलादेश मुक्तिलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना दिले जाणारे आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी आंदोलन पेटले आहे. या आंदोलनाची धग पंतप्रधान शेख हसीना यांच्या खुर्चीपर्यंत पोहोचली. राजीनामा देऊन त्यांना देश सोडावा लागला आहे, तरीही हिंसाचार थांबायचे नाव घेत नाही.

हिंदू नागरिकांवर ठरवून हल्ले केले जात आहेत, असे सांगितले जात आहेत. हिंदूंवर हल्ले करणाऱ्या या धर्मांध शक्तींच्या विरोधात आवाजही उठत आहेत. मुस्लिम तरिण मंदिरांचे, हिंदू नागरिकांचे रक्षण करत असल्याची छायाचित्रे यादरम्यान व्हायरल झाली आहेत.

वाढत्या हल्ल्यांमुळे हिंदू नागरिक भयभीत झाले असून, ते भारतात शरण घेऊ इच्छित आहेत. जलपायगुडी येथे भारत-बांगलादेश सीमेवर असे हजारो हिंदू नागरिक जमा झाले आहेत.

बांगलादेशात Bangladesh Violence सध्या जी परिस्थिती आहे तशीच परिस्थिती 1971 च्या युद्धाच्या आधीही होती. त्याची आता तुलना केली जाऊ लागली आहे. त्यावेळीही दहा महिन्यांच्या कालवधीत जवळपास एक कोटी बांगलादेशी शरणार्थी भारत-बांगलादेश सीमेवर गोळा झाले होते.

पूर्वी पाकिस्तानात म्हणजे बांगलादेशात पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू होते. बांगला भाषकांची हत्या करण्यात आली होती. लष्कराच्या त्रासापासून वाचण्यासाठी बांगलादेशी नागरिकांनी मोठ्या संख्येने भारतात घुसखोरी केली होती. त्यामुळे भारतात अशा शरणार्थीं नागरिकांची समस्या निर्माण झाली होती.

1947 मध्ये बंगालचे पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल असे विभाजन झाले होते. पश्चिम बंगाल भारतात राहिला. पूर्व बंगालचे नाव बदलून पूर्व पाकिस्तान असे ठेवण्यात आले. हा भाग पश्चिम पाकिस्तानच्या अधीन राहिला.

या भागात बांगला भाषकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पूर्वी पाकिस्तानच्या (बांगलादेश) लोकांनी पाकिस्तानच्या जाचातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना स्वातंत्र्य मिळाले. 1971 च्या या बांगलादेश मुक्तिसंग्रामादरम्यान बांगलादेशातील जवळपास एक कोटी नागरिकांनी पलायन करून भारतात आश्रय घेतला. त्यावेळी हे लोक पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसाममध्ये आश्रय घेतला होता.

बांगलादेशी नागरिकांनी भारतात शरण घेण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. 1960 च्या दशकातही घुसखोरी झाली होती. पूर्वी पाकिस्तानातील 1964 मधील दंगली आणि भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान 1965 मध्येही जवळपास सहा लाख नागरिकांनी भारतात घुसखोरी केल्याचे सांगितले जाते. 1946 ते 1958 दरम्यान जवळपास 41 लाख आणि 1959 ते 1971 दरम्यान 12 लाख बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केली होती.

बुधवारी ( 6 ऑगस्ट) एक हजारपेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक सीमेवर गोळा झाले होते. यात बहुतांश नागरिक हिंदू होते. बांगलादेशात जमावाकडून त्यांची घरे आणि प्रार्थनास्थळे पेटवून दिली जात आहेत, असा आरोप या नागरिकांनी केला. त्यामुळे त्यांना भारतात आश्रय हवा आहे. मात्र बीएसएफच्या जवानांनी त्यांना भारतात घुसू दिले नाही.

दरम्यान, घुसखोरीच्या शक्यतेमुळे बीएसएफची यंत्रणा सतर्क झाली आहे. सुरक्षा यंत्रणांसमोरील आव्हाने वाढली आहेत. दरम्यान, कट्टरपंथी जमावांकडून शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाच्या नेत्यांनाही लक्ष्य केले जात आहे. त्यांची घरेही पेटवून देण्यात येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT