Bhaskar Jadhav and Milind Narvekar's long-running political rivalry has resurfaced after fresh remarks sparked controversy within Shiv Sena (UBT). Sarkarnama
विशेष

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांनी पहिल्यांदा शिवसेना मिलिंद नार्वेकरांना नडूनच सोडली होती... 22 वर्षांच्या वादाची फुल हिस्ट्री!

Bhaskar Jadhav News : 2004 मध्ये मिलिंद नार्वेकरांवर आरोप करून शिवसेना सोडणारे भास्कर जाधव 2019 मध्ये त्यांच्याच मध्यस्थीने परतले. आता 22 वर्षांनंतर दोघांतील जुना संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

Hrishikesh Nalagune

राज ठाकरे असोत, नारायण राणे असोत किंवा एकनाथ शिंदे... या नेत्यांनी शिवसेना सोडताना एक नाव सातत्याने घेतलं आहे. या सर्वांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. मात्र या यादीतलं पहिलं मोठं नाव होतं भास्कर जाधव.

भास्कर जाधव यांनीच उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यावर आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप करून पहिल्यांदा शिवसेना सोडण्याचं धाडस केलं होतं. शिवसेना सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, पुन्हा शिवसेनेत परतले. शिवसेनेतील सर्वात मोठ्या फुटीनंतरही ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले.

आज पुन्हा एकदा भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर आमनेसामने आले आहेत. नुकतंच एका माध्यमाशी बोलताना जाधवांनी "नार्वेकर कोण लागून गेला?" असा सवाल केला, तर नार्वेकरांनी "विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे" असा पलटवार केला. या शाब्दिक चकमकीमुळे दोघांमधील तब्बल २२ वर्षांपूर्वीचा संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.

पाहुया भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर संघर्षाची फुल हिस्ट्री!

भास्कर जाधव यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतूनच सुरू झाली. १९८४ मध्ये त्यांनी पक्षात काम सुरू केलं. कोकणातील एक सामान्य कार्यकर्ता ते आमदार असा त्यांचा प्रवास बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने झाला. त्यावेळी मराठा समाजातील चेहरा दिल्यास जिल्हा परिषदेतील सत्ता जाण्याची भीती होती. त्यामुळे स्थानिक नेते आणि मनोहर जोशी यांचा जाधव यांच्या नावाला विरोध होता. पण बाळासाहेब ठाकरे जाधव यांच्यासारख्या शिवसैनिकाला तिकीट देण्यावर ठाम होते.

जिल्हा परिषदेनंतर १९९५ आणि १९९९ मध्ये भास्कर जाधव चिपळूणमधून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. पण २००४ मध्ये त्यांच्या राजकारणाला अचानक वळण मिळालं. शिवसेनेने केलेल्या एका अंतर्गत सर्व्हेत भास्कर जाधव पराभूत होतील, असा निष्कर्ष समोर आला होता. याच सर्व्हेच्या आधारे उद्धव ठाकरे यांनी भास्कर जाधव यांचं तिकीट कापलं. या कथित सर्व्हेमागे आणि तिकीट कापण्यागे मिलिंद नार्वेकर यांचंच ब्रेन असल्याचा संशय भास्कर जाधव यांना होता.

तिकीट नाकारल्यानंतर जाधव मातोश्रीवर गेले. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र बराच वेळ प्रतीक्षा करूनही भेट झाली नाही. या घटनेमुळे ते प्रचंड दुखावले गेले. त्यानंतर त्यांनी उघडपणे मिलिंद नार्वेकर यांच्यावर आरोप केले आणि शिवसेनेला रामराम ठोकला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वकाळात पक्ष सोडणारे ते पहिले मोठे नेते ठरले.

२००४ ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. पण त्याच वेळी शरद पवार यांनी संधी साधली. कोकणात शिवसेनेला टक्कर देऊ शकणारा नेता शोधत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाधव यांना पक्षात घेतलं. पुढे त्यांना मंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपद अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि ते राष्ट्रवादीतील मोठे नेते बनले.

दरम्यान, काळ पुढे सरकत गेला. १५ वर्षे उलटली.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी पुन्हा एकदा भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या. ते शिवसेनेत परतणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. विशेष म्हणजे ज्या मिलिंद नार्वेकरांवर आरोप करून त्यांनी पक्ष सोडला होता, त्याच नार्वेकरांनी त्यांच्या घरवापसीत महत्त्वाची भूमिका बजावली. जाधव आणि मातोश्री यांच्यातील संवाद पुन्हा सुरू करण्याचं काम नार्वेकरांनी केलं.

उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी ते दुवा बनले. राष्ट्रवादीच्या आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी जाधवांना विशेष विमानाने नेण्यापासून ते शिवसेनेतील पुनर्प्रवेशापर्यंत नार्वेकर प्रत्येक टप्प्यावर उपस्थित होते. एकेकाळी ज्यांच्यावर आरोप करून पक्ष सोडला, त्याच व्यक्तीच्या मध्यस्थीने भास्कर जाधव पुन्हा शिवसेनेत परतले होते.

यानंतर शिवसेनेत झालेल्या सर्वात मोठ्या फुटीतही भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. त्यामुळे जुने वाद संपल्याचं मानलं जात होतं. मात्र नुकतंच शिवसेनेच्या वर्धापन दिनी घडलेल्या एका छोट्याशा प्रसंगाने या दोघांमधील संघर्ष अजूनही तेवढाच धगधगत आहे, हे दिसून आले.

षण्मुखानंद सभागृहाबाहेर भास्कर जाधव पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी मागून एका गाडीचा सतत हॉर्न वाजत होता. ती गाडी मिलिंद नार्वेकर यांची असल्याचं समजताच जाधव संतापले. कॅमेऱ्यासमोरच त्यांनी "नार्वेकर कोण लागून गेला?" असा सवाल केला. पक्षाचा नेता असला म्हणजे त्याने इतरांना त्रास देण्याचा अधिकार मिळत नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला. नार्वेकरांनीही या जाहीर अपमानाचा जाहीर बदला घेतला.

नार्वेकरांनी जाधवांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत, "विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याने ते नैराश्यात असल्याचा टोला लगावला. जाधवांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. "नार्वेकरांनी आपल्या सर्वपक्षीय संबंधांचा उपयोग निष्ठावंत कार्यकर्त्यांना टोमणे मारण्यासाठी नव्हे, तर रखडलेलं विरोधी पक्षनेतेपद मिळवून देण्यासाठी करावा", असा सल्ला त्यांनी दिला.

खरंतर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आणि पडद्यामागचे शक्तिशाली रणनीतीकार मानले जातात. कधीकाळी उद्धव ठाकरे यांचे पीए असणारे नार्वेकर पक्षाचे सचिव बनले अन् त्यानंतर थेट आमदार झाले. नार्वेकर हे बऱ्याचदा उद्धव ठाकरे आणि आमदारांच्या दरम्यान एक 'अभेद्य भिंत' बनून उभे राहायचे. त्यामुळे ते शिवसैनिकांच्या डोळ्यात आजही खुपत असतात.

ग्रामीण भागातून किंवा घाटावरून आलेल्या ज्येष्ठ आमदारांना आणि मंत्र्यांनाही पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी तासनतास नार्वेकरांच्या परवानगीची वाट पाहावी लागायची, ज्यामुळे जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा स्वाभिमान दुखावला जात असे. त्यातच, कोणतीही जनमानसाची मोठी पार्श्वभूमी नसतानाही पक्षाच्या अंतर्गत नियुक्त्या, मतदारसंघातील निर्णय आणि निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये नार्वेकरांचा शब्द अंतिम मानला जायचा.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातही निवडून आलेले नेते बाजूला राहून सत्ता आणि निर्णयप्रक्रियेची सूत्रे नार्वेकरांभोवतीच फिरत असल्याने आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. थोडक्यात सांगायचे तर, नार्वेकर हे ठाकरेंचे 'कान आणि डोळे' असले, तरी सर्वसामान्य आमदारांसाठी ते 'मातोश्री'चे गेटकीपर ठरल्यामुळेच त्यांच्याविरोधात नेहमी रोष पाहायला मिळतो.

आता भास्कर जाधव यांचाही मिलिंद नार्वेकर यांच्यावर राग असल्याचे दिसून येते. आज दोघेही उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेत आहेत. पण त्यांच्या नात्याचा इतिहास पाहिला तर तो केवळ राजकीय सहकाऱ्यांचा नाही. २००४ मध्ये पक्षातून बाहेर पडण्यापासून ते २०१९ मध्ये घरवापसीपर्यंत आणि आता पुन्हा उफाळलेल्या वादापर्यंत, भास्कर जाधव यांच्या राजकीय प्रवासात मिलिंद नार्वेकर हे कायमच केंद्रस्थानी राहिले आहेत.

आज मिलिंद नार्वेकर हे भास्कर जाधव यांच्या डोळ्यात खुपू लागले आहेत. त्यामुळेच हा वाद केवळ दोन नेत्यांमधील शाब्दिक चकमक नसून, शिवसेनेच्या दोन दशकांच्या अंतर्गत राजकारणाचा आरसा मानला जात आहे. शिवसेनेत जाधवांची घरवापसी घडवून आणणारा सर्वात महत्त्वाचा चेहरा म्हणून मिलिंद नार्वेकर यांचे नाव घेतले जाते हेही तितकेच खरे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT