Dattatray Bharane-Harshvardhan Patil Sarkarnama
विशेष

राज्यमंत्री भरणेंची विकासाची घौडदौड रोखून कमबॅकचे हर्षवर्धन पाटलांपुढे मोठे आव्हान

विधानसभेच्या निकालात मतांची बेरीज वजाबाकी करण्यासाठी या कारखान्याच्या कामकाजाला महत्त्व आहे.

विनायक चांदगुडे

शेटफळगढे (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यमंत्रिपदी काम करण्याची मिळालेली संधी, तालुक्यात विकास कामांसाठी आणलेला कोट्यवधींचा निधी, शेती सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार, कायम ठेवलेला जनसंपर्क या आधारे दत्तात्रेय भरणे यांची राजकीय घोडदौड विधानसभेच्या दोन वर्षांच्या निकालानंतरही (विधानसभा निकालास रविवारी ता. २४ ऑक्टोबर दोन वर्षे पूर्ण होत आहेत) वेगात सुरू आहे. त्यामुळे भरणे यांची ही घोडदौड रोखून पुन्हा कमबॅक करण्याचे मोठे आव्हान माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यापुढे असणार आहे. (Big challenge for Harshvardhan Patil to stop Minister of State Dattatreya Bharane)

भरणे यांनी त्यांच्याकडे असलेल्या सहा खात्याच्या माध्यमातून आपल्या कामाचा ठसा प्रशासनावर व जनतेवर उमटविला आहे. राज्यातील टॉप टेन मंत्र्यांच्या कामकाजाच्या यादीत भरणे यांनी स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर तालुक्यातही जिल्हा नियोजन समिती, राज्य सरकार यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी विकास कामांसाठी आणल्याने गावोगावी विकासकामे सुरू आहेत. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या कामासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पात निधीची तरतूद करून घेतली आहे. सध्या या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याशिवाय मंत्रिपदावर असूनही भरणे यांचा तालुक्यातील जनसंपर्क कायम आहे. या सर्व बाबींच्या आधारे भरणे यांची राजकीय घोडदौड सध्या वेगात सुरू आहे.

भरणे यांची ही घोडदौड रोखण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना गेल्या आठ वर्षांपासून सत्ता नसतानाही पाठीशी असलेल्या कार्यकर्त्यांना आत्तापासूनच पाठबळ देऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याकरीता आगामी चार महिन्यांत होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणावे लागणार आहेत. त्यासाठी पाटील यांना गावोगावच्या कार्यकर्त्यांना मेळावे, गाव भेटी याद्वारे सक्रिय करावे लागणार आहे. त्याचबरोबर केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या योजना, विकास कामे, अनुदानाच्या विविध योजना या बाबी लोकांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. तसेच, तीन जिल्हा परिषद सदस्य आणि जवळपास ८ पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून आपापल्या गण व गटातील मंजूर विकास कामे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भाजपचे विधान परिषदेचे आमदार व राज्यसभेचे खासदार यांच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या ताब्यातील ग्रामपंचायतींसाठी विकास निधी आणणे गरजेचे आहे. याशिवाय कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे. पण, विधानसभेच्या निकालात मतांची बेरीज वजाबाकी करण्यासाठी या कारखान्याच्या कामकाजाला महत्त्व आहे. पाटील यांना मानणारे शेतकरीदेखील याच कारखान्याला ऊस घालण्यास प्रतिवर्षी प्राधान्य देतात. म्हणूनच या कारखान्याचे कामकाज व्यवस्थित करून प्रसंगी कठोर निर्णय घेऊन सभासदांना गाळप केलेल्या उसाचे पैसे वेळेवर उपलब्ध करून दिल्यास व इतर कारखान्याप्रमाणे बाजारभाव दिल्यास पाटील यांना निवडणुकीत त्याची मदत होऊ शकते.

गावपुढाऱ्यांना कमी लेखण्याची चूक करू नका

इंदापूरच्या नेत्यांची राजकीय वाटचाल गावोगावच्या पुढाऱ्यांवर अवलंबून आहे. सध्या या गाव पुढाऱ्यांच्या हातात काय राहिले नसून जनता माझ्या बरोबर आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण गावचा पुढारी पाच वर्षे गोरगरीब लोकांच्या उपयोगी पडतो. त्यांच्या दवाखान्यापासून त्याला आर्थिक मदत, उसनवारी पैसे देण्यापर्यंत त्याच्या सुख दुःखात मदत करीत असतो. पदरमोड करून जनतेची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो. याच कामाच्या आधारावर तो आपल्या नेत्यांसाठी मते मागतो. प्रत्यक्षात मतदान घडवून आणतो, त्यामुळे विधानसभेच्या अल्प मताच्या जय पराजयाच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व तोंडावर बोट ठेवून गप्प असलेल्या या गावपुढाऱ्याला जो कमी लेखून ताकद देणार नाही, त्या नेत्यांना याची राजकीय किंमत आगामी काळात मोजावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT