बिहारमध्ये ‘एनडीए’ला मिळालेल्या एकतर्फी आणि दणदणीत विजयामुळे आणि त्यातही भाजप हा क्रमांक एकचा पक्ष बनल्याने हिंदी पट्ट्याचे राजकारण आगामी दीर्घकाळ भाजप केंद्रितच राहील, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, बिहारमध्ये भाजपला दणका बसेल आणि त्याआधारे दिल्लीतील सत्ता अस्थिर होईल या अपेक्षेत असलेल्या विरोधकांची निराशा झाली आहे. भाजपच्या स्थैर्याचा आणि विरोधकांच्या अस्थैर्याचा संदेश बिहारमधून समोर आल्याने राष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ घडण्याची शक्यता धूसर झाली आहे.
मतचोरीसारख्या विषयाचा प्रचंड गाजावाजा करूनही काँग्रेसची वाताहत ‘इंडिया’ आघाडीतील काँग्रेसच्या उपयुक्ततेवर सवाल उपस्थित करणारी आहे आणि भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष असाच सामना पुढच्या काळात दिसेल. राजकीय अपयशात नेतृत्वाचे सातत्य आणि खिळखिळी झालेली संघटनात्मक ताकद हे वास्तव असूनही मतचोरी हाच मुद्दा काँग्रेसला चर्चेत राहण्यासाठी उपयुक्त ठरेल.
मतदानोत्तर कल चाचण्यांच्या आधारे बिहारमध्ये ज्या निकालांचे अंदाज वर्तविण्यात आले, जवळपास तसेच निकाल लागले. बिहारी मतदारांनी २४३ पैकी २०२ म्हणजे एकूण तीन चतुर्थांशपेक्षा जास्त जागा सत्ताधारी ‘एनडीए’च्या झोळीत घातल्या आहेत. त्यातही भाजपला बिहारमध्ये सर्वाधिक (८९) जागा जिंकणारा पक्ष बनला आहे. २०१० मध्ये संयुक्त जनता दलाने ११५ जागा आणि भाजपने ९१ जागा जिंकल्या होत्या. जवळपास त्याच कामगिरीची पुनरावृत्ती भाजपने केली आहे.
आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू आणि पुदुच्चेरी या पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. त्यानंतर लगेच २०२७ च्या प्रारंभी उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. ते पाहता भाजपला हिंदी पट्ट्यातील महत्त्वाचे राज्य असलेल्या बिहारमध्ये ज्याप्रकारे दणदणीत विजय अपेक्षित होता तो मिळाला आहे.
बिहारमध्ये नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष ८५ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनिती इतकाच निर्णायक वाटा मुरब्बी राजकारणी नितीश कुमार यांचाही राहिला. ७४ वर्षीय नितीश कुमार यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी तऱ्हेतऱ्हेच्या चर्चा राजकीय वर्तुळात चघळल्या. ओबीसी आणि अतिमागास जातींची बांधलेली मोट, महिलांसाठीच्या योजना या सामाजिक-आर्थिक समीकरणातून नितीशबाबूंचे राजकारण अभेद्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होतील. परंतु प्रकृतीचे कारण आणि संयुक्त जनता दलाचे दुसऱ्या क्रमांकावर असणे यामुळे ते पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहतीलच, याबाबत साशंकता आहे.
केंद्रात भाजपचे स्वबळावर बहुमत नसल्याने नितीश कुमार आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसमच्या टेकूवर केंद्रातील सत्ता अवलंबून आहे. बिहारमध्ये भाजपची ताकद घटली असती तर जेडीयू आणि तेलुगू देसमची बार्गेंनिंग पॉवर वाढली असती. महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या पक्षांकडून दबाव येऊ शकला असता. या सर्व शक्यता बिहारच्या निकालांनी मावळल्या आहे. याशिवाय, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीत अंतिम निर्णय संघाचा की भाजप नेतृत्वाचा यावरून भाजप आणि मातृ संघटनेत शीतयुद्ध असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. बिहारच्या निकालांवर बरेच काही अवलंबून असेल असेही बोलले जात होते. मात्र ‘एनडीए’च्या विशेषतः भाजपच्या विजयाने ही चर्चाही निरर्थक ठरविली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.