BJP is expected to make a strong claim for the Chhatrapati Sambhajinagar-Jalna local authority constituency in the upcoming Maharashtra MLC elections. Sarkarnama
विशेष

MLC Election : भाजपने शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ पोखरला : आणखी एक आमदार वाढणार; गोरंट्याल की केनेकर, कोणाला मिळणार संधी?

MLC Election : छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप मजबूत दावा करण्याच्या तयारीत आहे. अलीकडील स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने दोन्ही जिल्ह्यांत मोठे वर्चस्व मिळवले आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar-Jalna Constituency : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर 22 जूनरोजी मतमोजणी होणार आहे.

यंदा या जागेवर भाजपाकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावा केला जाऊ शकतो. गतवेळी शिवसेना-भाजप युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. परंतु 3-4 वर्षात भाजपाने या मतदारसंघावर मजबूत पकड मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा परिषदेत भाजपाने मित्रपक्ष शिवसेनेला मागे टाकत दोन्ही जिल्ह्यांमध्ये नंबर एकचा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे.

शिवसेनेत पडलेली फूट, राज्याच्या सत्तेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यामुळे भाजपाचा वरचष्मा पाहता शिवसेनेला ही जागा राखणे कठीणच असणार आहे, शिवाय दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर दिसून येईल.

जालना नगरपरिषदेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत 65 पैकी 41 जागांवर विजय मिळवून भाजपने येथे एकहाती स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर शिवसेना 12 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जालना जिल्ह्यातील नगर परिषदांचा विचार केला तर जिल्ह्यातील तीन पैकी दोन नगरपालिकेत भाजपाचे नगराध्यक्ष विराजमान आहेत. तर भोकरदन या एकमेवर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बाजी मारली आहे.

नगरपरिषदेतील एकूण 65 नगरसेवकांचा विचार केला तर सर्वाधिक 28 नगरसेवक हे एकट्या भाजपाचे निवडून आले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 19, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे 6, काँग्रेस 6, उद्धव ठाकरेंची शिवसेना 3, शिंदेंच्या शिवसेनेने एका सदस्यासह खाते उघडले आहेत. तर राष्ट्रीय समाज पक्षाचेही दोन नगरसेवक जालना जिल्ह्यात निवडून आले आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यात भाजपाचा बोलबाला आहे.

संभाजीनगरमध्ये कमळचाच जोर -

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शिवसेनेसह विरोधी पक्षांनाही दूर लोटले आहे. संभाजीनगर महापालिकेवर शतप्रतिशत भाजपाचे स्वप्न या निवडणुकीत पूर्ण करण्यात पक्षाच्या नेत्यांना यश आले आहे. भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवत तब्बल 57 जागा जिंकल्या आहेत. बहुमतापासून केवळ एका जागेपासून दूर असलेल्या भाजपाने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व सिद्ध केले. तर शिंदे यांच्या शिवसेनेला इथे फक्त 13 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

जिल्हा परिषदेतही भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. 63 पैकी 23 जागा जिंकलेल्या भाजपाने सत्तेसाठी पुढे असे काही राजकीय डावपेच टाकले की मित्र पक्ष शिवसेना व विरोधक त्यात गारद झाले. त्यामुळे भाजपाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महत्त्वाची सभापती पदं ही त्यांच्याच वाट्याला आली. महापालिका, जिल्हा परिषदेत भाजपने एकहीत सत्ता राखली आणि जिल्ह्यात आम्हीच मोठा भाऊ हे दाखवून दिले.

नगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहिली. शिंदेच्या शिवसेनेन सर्वाधिक 55 सदस्य निवडून आणले. पण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सिल्लोड, पैठण वगळता इतर तालुक्यात त्यांना यश मिळवता आले नाही. भाजपाच्या वाट्यालाही एकमेव वैजापूरचे नगराध्यक्ष पद आले. राष्ट्रवादी काँग्रेसला देखील एकमेव गंगापूरला नगराध्यक्ष करता आला. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने कन्नड आणि खुलताबाद तालुक्यात नगराध्यक्ष खुर्चीत बसवत महायुतीला धक्का दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या फुलंब्रीत जोरदार दणका देत नगराध्यक्षपद पटकावले. निवडून आलेल्या नगरसेवक, सदस्यांचा विचार केला तर जिल्ह्यात शिवसेनेने 55 सदस्यांसह नंबर एक होण्याचा मान पटकावला. त्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस 39, भाजपा 37, काँग्रेस 18, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 9, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,1 तर एका जागेवर अपक्षाने खाते उघडले होते.

गोरंट्याल, आंबेकर, केनेकरांच्या नावाची चर्चा..

2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला होता. अंबादास दानवे यांनी विक्रमी मताधिक्याने निवडून येत 6 वर्ष सभागृहात प्रतिनिधित्व केले होते. या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, भाजपाची वाढलेली ताकद पाहता यावेळी या मतदारसंघावर भाजपाचा दावा प्रबळ असणार आहे.

शिवाय गेल्यावेळी संभाजीनगरमधून उमेदवार देण्यात आला होता, यावेळी जालन्यातून उमेदवार दिला जाईल, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. महापालिकेत भाजपचे शतप्रतिशत कमळ फुलवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्थानिक स्वराज्यमधून त्यांना उमेदवारी देत पक्ष त्याचे राजकीय पुनर्वसन करण्याची अधिक शक्यता आहे.

माजी आमदार संजय केनेकर यांना विधान परिषदेत सर्वात कमी कार्यकाळ मिळाल्यामुळे त्यांचाही दावा कायम आहे. शिवसेना हा मतदारसंघ स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता तशी कमीच आहे. तरीही या पक्षाकडे जालन्यातून भास्कर आंबेकर यांचे तर छत्रपती संभाजीनगरमधून माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन यांच्या नावांची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT