Mahayuti alliance Maharashtra : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा पाच पैकी तीन जागा गमवाव्या लागल्या. या पराभवाचे खापर भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीने थेट एकनाथ शिंदे शिवसेनेवर फोडले. राष्ट्रवादीपेक्षा भाजपने थेट हल्ला केल्याचे एकनाथ शिंदे शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले. परंतु यानिमित्ताने महायुतीमधील खदखद समोर आली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या राजकीय विस्ताराची महत्त्वाकांक्षा आणि पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. यासाठी केंद्रातील भाजप श्रेष्ठींकडे लावलेली 'फिल्डिंग'!
एकनाथ शिंदे शिवसेनेतील राज्यातील भाजप नेत्यांनी हे केव्हाच हेरलय. हा सगळा वचपा विधान परिषदेतील निवडणुकीच्या अपयशातून भाजपने एकनाथ शिंदे शिवसेनेवर काढायला आयते कोलित मिळाले. महायुतीमधील भाजप अन् एकनाथ शिंदे शिवसेनेचे वाद आता एवढ्या विकोपाला गेले आहेत की, यातून भाजपला एकनाथ शिंदेंची गरज उरली नाही का? असा प्रश्न चर्चेत आला आहे.
यानिमित्ताने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात स्वतंत्र केलेल्या वाटचालीपासून मागोवा घ्यावा लागतो. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्याचबरोबर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह बरोबर घेत, भाजपच्या मदतीने सत्तेत आले. मात्र त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शिंदे शिवसेनेला केवळ भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून राहायचे नाही. मंत्रिमंडळातील वाटा, विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागावाटप यामध्ये त्यांना समान राजकीय सन्मान अपेक्षित आहे.
विधानसभेच्या 2024-25च्या निवडणुकांमध्ये भाजपने (BJP) एकनाथ शिंदेंचा खुबीने वापर करून घेतला. पण भाजप राज्यात महायुतीत मोठा भाऊ ठरला अन् मुख्यमंत्रीपद पटकावले. पुढे ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा बँक, राज्यातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीत एकनाथ शिंदेंना भाजपबरोबरीने वाटा हवा होता. यावरून दोघा पक्षांमध्ये खटके उडत राहिले. महायुतीत दोघांमध्ये संघर्ष पेटत राहिलेला दिसला. यातून सध्या तरी एकमेकांविरोधात अविश्वास वाढलेला दिसतो आहे.
विधान परिषद निवडणुकीला समोरे जाताना, बंडखोरी वाढली. यातून महायुतीत विश्वासाला तडे गेले. पुणे शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेनेने भाजपच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिला. जागावाटपात शिंदे शिवसेनेला योग्य स्थान मिळत नसल्याची नाराजी पक्षातील नेत्यांनी व्यक्त केली. यातून दोघांमध्ये समन्वय नसल्याचे अधोरेखित झाले. पुढे दोघांमध्ये अधिक राजकीय संघर्ष पेटणार असल्याचे संकेत आहेत.
महायुतीमधील या संघर्षामुळे भाजपची महाराष्ट्रातील राजकीय रणनीती दीर्घकालीन आहे हे स्पष्ट होते. राज्यातील अधिकाधिक विधानसभा मतदारसंघ, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय संघटनांवर स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा पुढील काळात प्रयत्न असणार आहे. अशा परिस्थितीत शिंदे शिवसेनेला राजकीय ताकद देणे म्हणजे भविष्यातील जागावाटपात आणि सत्तावाटपात आणखी एक मजबूत दावेदार तयार करणे आहे. त्यामुळे भाजप शिंदे शिवसेनेला कितपत सोबत ठेवू शकतो, हा राजकीय संशोधनाचा विषय आहे.
शिवसेनेतील काही नेत्यांकडून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. त्यासाठी जास्तीत जास्त विधानसभा मतदारसंघात संघटन मजबूत करण्यावर शिवसेनेचा भर आहे. तसे काही नेत्यांनी यावर जाहीरपणे भाष्य केले आहे. विधान परिषद निवडणुकीतील निकालानंतर यावर एकनाथ शिंदे शिवसेना पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच शिंदे शिवसेनेतून नेतृत्वबदलाची मागणी पुढे येणे हे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या संवेदनशील ठरू शकते. सत्तेत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असले, तरी शिंदे शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा संपली नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले.
राज्य सरकारमध्ये दोन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी त्यांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेसोबतच्या स्थानिक आघाडीवरून भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने मनसेसोबतची युती तोडा, अन्यथा विरोधात बसण्याचा इशारा भाजपने दिला आहे. यातून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे, राज्यात महायुती आणि स्थानिक पातळीवर मात्र स्वतंत्र राजकीय समीकरणे, हे भाजपला मान्य आहे का? याचा दुसरा अर्थ असा निघतो की, भाजप पुढे स्वतंत्र असा पर्याय आहे. तो कुणीही असू शकतो. मुंबईतील एका कार्यक्रमात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद दाराआड केलेल्या चर्चेचे उत्तम उदाहरण आहे. ठाकरेंचा भाजपसमोर पर्याय आहे, हे एकनाथ शिंदेंना सूचक असा संकेत दिलेला दिसतो.
मित्रपक्ष म्हणून शिंदे शिवसेनेला किती राजकीय स्वातंत्र्य द्यायचे? हे भाजप सध्या तरी ठरवताना दिसतो. यातून महायुतीत सर्वाधिक खटके या दोघा पक्षांमध्ये उडताना दिसतात. पुणे विधान परिषद निवडणुकीत मंगेश चिवटे यांना दिलेली उमेदवार आणि ऐनवेळी काढून घ्यायला लागली, याकडे त्याच नजरेतून पाहाता येईल. त्यामुळे भाजप आणि शिंदे शिवसेनेतील संघर्ष केवळ जागावाटपापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर एकमेकांवर कुरघोड्या करण्यापर्यंत गेलेला दिसतो. यातूनच विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतरही दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप वाढलेले दिसतात. सोशल मीडियावर दोन्ही बाजूचे नेते वैयक्तिक पोस्टर वॉरही सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना भाजपवर सार्वजनिक टीका टाळण्याचे आवाहन केले असले, तरी नेत्यांनी टीकेचे बाण कमी केलेले दिसत नाही.
भाजपला शिंदे शिवसेनेची गरज कमी झाली आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना, शिंदे शिवसेनेच्या बंडानंतर भाजपला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महत्त्वाचा सहकारी मिळाला. मात्र आता भाजपची स्वतःची संघटनात्मक ताकद, विधानसभा निवडणुकीतील कामगिरी आणि सत्तेतील नेतृत्व यामुळे शिंदे शिवसेनेवरील अवलंबित्व किती राहिले आहे, याची चर्चा भाजपांतर्गत सुरू आहे. यातून संघटन वाढीवर भाजप आगामी काळात भर देताना दिसतोय. भाजप ही राजकीय रणनीती एकनाथ शिंदे शिवसेनेपासून लपलेली नाही. यातून शिंदे शिवसेनेचे आमदार, खासदार, स्थानिक नेते आणि त्यांचा स्वतंत्र मतदारवर्ग हेही भाजपसाठी महत्त्वाचे राजकीय घटक आहेत. हे देखील एकनाथ शिंदे शिवसेनेने महायुतीत आपले उपद्रव मूल्य दाखवून सिद्ध केलेले आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेला पूर्णपणे बाजूला करणे भाजपसाठीही सोपे समीकरण दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.