BJP Politics Sarkarnama
विशेष

Bjp Political News : लोकसभेचं 'मिशन 45' फेल; विधानसभेसाठी आता भाजपचं पुन्हा नवं 'टार्गेट' ठरलं !

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत भाजपने देशभरात 'अब की बार चारशे पार' तर राज्यात 'अब की बार 45 पार' ही घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात देशात बहुमताचा आकडा सुद्धा गाठताना भाजपला कसरत करावी लागली होती. भाजपने बहुमताचा आकडा मित्रपक्षांच्या मदतीने पूर्ण केला. दुसरीकडे राज्यातील 48 पैकी महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे येत्या काळात राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप मिशन ठरविणार नाही, असेच सर्वांना वाटत होते.

तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आता पुन्हा एकदा मिशन ठरवले आहे. यावेळेस पूर्ण महायुतीचे मिशन न ठरविता केवळ भाजपने मिशन ठरवले आहे. राज्यातील 150 ते 160 जागा लढविताना 125 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरविले असून त्यासाठी संपूर्ण भाजपची टीम कामाला लावली आहे.

आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. यातील 125 जागांचं मिशन भाजपने विधानसभेत ठेवले आहे. हे मिशन पूर्ण करण्यासाठी भाजपने प्लॅन ठरवला आहे. राज्यातील जवळपास 50 जागांवर भाजपचा (BJP) विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे उर्वरित 75 जागांवर निवडून येण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी भाजपने वेगळे प्लॅनिंग राबवले आहे, विजय मिळवू शकतो, अशा 75 विधानसभा मतदारसंघावर भर दिला आहे.

राज्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर 122 जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत (Shivsena) युती करून निवडणूक लढवताना भाजपने 104 जागी विजय मिळवला होता. त्यामुळे भाजपासाठी हे मिशन अवघड नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे येत्या काळात या जागा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

भाजपकडून या उरलेल्या 75 जागांसाठी वेगळी रणनिती ठरवण्यात आली आहे. या 75 जागा ज्या कोणत्या जिल्ह्यात असतील, त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यावर त्या मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार आहे. हा अहवाल राज्यातील भाजप वरिष्ठांना आणि केंद्रातील वरिष्ठांना दिला जाणार आहे. तसेच यात जे काही मतदारसंघ असतील, त्या मतदारसंघात तो नेता ग्राऊंड लेव्हला काम करणार आहे. विशेषतः यामध्ये सामान्य मतदारांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत एकत्र बांधणी करण्यात येणार आहे.

हे करीत असताना महायुतीमधील घटक पक्षाची मदत घेतली जाणार आहे. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरला असून भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढणार आहे तर शिंदे गट 60 ते 70 जागा तर अजित पवार गट 50 ते 60 जागा लढणार असल्याचे समजते.

त्यासोबतच लोकसभा निवडणुकीतील सर्व्हेमध्ये काही जागांवरील उमेदवार बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र केवळ 6 जणांची उमेदवारी बदलून 16 जणांना पुन्हा रिंगणात उतरवले होते. त्यापैकी केवळ नितीन गडकरी, रक्षा खडसे हे दोन खासदार पुन्हा निवडून आले होते. तर बाकी 7 खासदार नव्याने निवडून आले होते. त्यामुळे ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी येत्या काळात विधानसभेला सर्व्हेत नावे नसलेल्या बऱ्याच आमदारांचे तिकीट कापण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT