Nitin Gadkari | Maharashtra to National Politics Sarkarnama
विशेष

Nitin Gadkari : दिल्लीच्या राजकारणातील महाराष्ट्राचा ‘वजनदार’ चेहरा : विरोधकही ऐकतात, सत्ताधारीही मानतात...

Nitin Gadkari News : महाराष्ट्राच्या राजकारणापासून दिल्लीपर्यंत नितीन गडकरी यांनी स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण केली. कामाचा आवाका, सर्वपक्षीयांशी संबंध आणि संघाशी असलेले नाते यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांचा प्रभाव वाढला.

Deepak Kulkarni

Nitin Gadkari News : महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवारांपर्यंत अनेक दिग्गजांनी राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप सोडली. भाजपच्या राजकारणात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचा ठसा उमटवणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. महाराष्ट्राच्या राजकारणापासून दिल्लीपर्यंतचा त्यांचा प्रवास, कामाचा आवाका, सर्वपक्षीयांशी असलेले संबंध आणि संघाशी असलेले नाते यामुळे गडकरी यांची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण झाली आहे.

आमदारकीपासून दिल्लीपर्यंतचा प्रवास

नितीन गडकरी यांनी १९९० मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळात म्हणून प्रवेश केला. नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून ते सलग चारवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केले. या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देतानाच राज्यातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यावर त्यांनी भर दिला.

१९९९ ते २००५ या दरम्यान, गडकरी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते होते. त्यानंतर २००५ ते २००९ या काळात त्यांच्याकडे महाराष्ट्र भाजपची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. या संपूर्ण कार्यकाळात भाजप पक्षश्रेष्ठींनी गडकरींच्या नेतृत्वाची चुणूक जवळून अनुभवली होती. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरात उभारलेलं भाजपचं पक्षसंघटन वाखाणण्याजोगं होतं. त्यांच्या या कामाची पोहोचपावती म्हणून २००९ मध्ये त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडली.

राज्याच्या राजकारणात चांगला जम बसलेला असताना २००९ मध्ये गडकरींची राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री झाली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना त्यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. २००४ आणि २००९ मधील लोकसभा निवडणुकांतील पराभवानंतर भाजपनं गडकरींच्या रुपानं मराठी नेता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडला होता. पण ही निवड म्हणजे एकप्रकारे गडकरी यांच्या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक्झिटचेच ते संकेत होते.

राष्ट्रीय अध्यक्षपदी काम करताना गडकरींनी नवे-जुने नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना हाताशी घेत भाजपला तळागळापर्यंत पोहोचवले. देशभरात काँग्रेसविरोधात आक्रमकपणे वातावरण तयार केले. अण्णा हजारे आंदोलन, डॉ. मनमोहनसिंह सरकारमधील भ्रष्टाचाराची प्रकरण अशा विविध माध्यमातून भाजपच्या बाजूने राजकीय वातावरण निर्मितीला हातभार लावला. विविध राज्यांतील भाजपसह सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचं नातंही निर्माण केलं. त्याचा बराच फायदाही भाजपला २०१४ निवडणुकीत झाला. 

२०१४ मध्ये गडकरींची खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून राष्ट्रीय राजकारणात नवी इनिंग सुरु झाली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर गडकरींकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. सध्याही त्यांच्याकडे हीच जबाबदारी कायम आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात हायवे, एक्स्प्रेस वे बांधणीत गडकरींचे नाव सातत्याने चर्चेत राहिले. एकूणच गडकरी यांच्यामागे दीड दशकांचा राष्ट्रीय राजकारणातील अनुभव हा महत्त्वाच फॅक्टर आहे.

संघाची मुशीतून घडलेले राजकारण

विदर्भातील नागपूरच्या भूमीतून आलेले गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडले. भाजपच्या संघटनात्मक राजकारणात काम करत त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही भूषवले. त्यामुळे संघाशी असलेले त्यांचे कनेक्शन आणि भाजपच्या संघटनात्मक राजकारणातील दीर्घ अनुभव ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची महत्त्वाची बाजू आहे. विशेष म्हणजे, केंद्रात दीर्घकाळ मंत्री राहूनही त्यांनी नागपूर आणि आपल्या मतदारसंघाशी असलेली नाळ कायम ठेवली. त्यामुळे दिल्लीतील राजकारण आणि स्थानिक जनसंपर्क यांचा मेळ साधण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

सत्ताधारी असो की विरोधक; गडकरींचा ‘कनेक्ट’

गडकरींच्या राजकारणातील सर्वात मोठ्या जमेच्या बाजूंपैकी एक म्हणजे त्यांचा सर्वपक्षीय संपर्क. सत्ताधारी पक्षातील आमदार-खासदार असो किंवा विरोधी पक्षातील नेता; आपल्या मतदारसंघातील रस्ते, पूल, महामार्ग किंवा इतर पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न घेऊन आलेल्या लोकप्रतिनिधींना गडकरी भेटतात आणि प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात, अशी त्यांची प्रतिमा आहे. यामुळे गडकरींना केवळ भाजपचे नेते म्हणून नव्हे, तर राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपणारा नेता म्हणूनही पाहिले जाते.

संसदेतही वेगळे चित्र

गडकरी संसदेत एखाद्या विषयावर बोलत असताना किंवा आपल्या मंत्रालयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देत असताना विरोधी बाकांवरूनही तुलनेने संयत वातावरण पाहायला मिळते. यामागे त्यांच्या कामाची माहिती, विषयावरील पकड आणि विरोधकांशी असलेले वैयक्तिक संबंध हे महत्त्वाचे घटक मानले जातात. राजकीय मतभेद असले तरी व्यक्तीगत संबंध खराब न करण्याची त्यांची शैली त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग ठरली आहे.

‘जे आहे ते आहे’ म्हणणारा बिनधास्त नेता

गडकरींच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू म्हणजे त्यांची स्पष्टवक्तेपणाची शैली. राजकारणातील एखाद्या प्रश्नावर बोलताना पक्षाच्या चौकटीत अडकून न राहता आपले मत स्पष्टपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. सत्ता कायमची नसते, पदे येतात आणि जातात, त्यामुळे राजकारणात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, अशी भूमिका ते अनेकदा मांडताना दिसतात. राजकीय वादळे आली किंवा पराभव झाला तरी त्यावर तात्काळ भावनिक प्रतिक्रिया न देता योग्य वेळ साधण्याची त्यांची शैलीही त्यांच्या राजकीय प्रवासात दिसून येते.

शरद पवारांशी साम्य कुठे?

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि नितीन गडकरी यांची राजकीय विचारधारा वेगळी असली तरी त्यांच्या कार्यपद्धतीत काही साम्य असल्याचे राजकीय निरीक्षक मानतात. दोन्ही नेत्यांची राजकारणातील शैली संयमी, मुत्सद्दी आणि दीर्घकालीन राजकीय गणितांचा विचार करणारी राहिली आहे. राजकीय विरोधकांशी मतभेद असले तरी वैयक्तिक संबंध कायम ठेवण्याची दोघांचीही हातोटी अनेकदा चर्चेत राहिली आहे.

पण गडकरींच्या मर्यादाही आहेत?

गडकरींचा राष्ट्रीय राजकारणातील प्रभाव मोठा असला तरी केंद्र सरकारच्या निर्णयप्रक्रियेत त्यांच्या भूमिकेच्या मर्यादाही आहेत. दिल्लीचे राजकारण जवळून पाहणारे सकाळचे दिल्ली प्रतिनिधी अजय बुवा यांच्या विश्लेषणानुसार, गडकरी हे केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांपैकी एक असले तरी सरकारच्या सर्व निर्णयप्रक्रियेवर त्यांचे नियंत्रण नाही. 

गडकरी यांचा स्वतःच्या मंत्रालयाशी संबंधित निर्णयांमध्ये मोठा प्रभाव असला, तरी सरकारच्या एकूण धोरणात्मक निर्णयांमध्ये अंतिम नियंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडेच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच गडकरींचे राजकीय वजन मोठे असले, तरी ते केंद्रातील सत्ताकेंद्राचा स्वतंत्र ध्रुव आहेत, असे सरसकट म्हणता येणार नाही.

महाराष्ट्राचा दिल्लीतील ‘वजनदार’ चेहरा

यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, मधू दंडवते, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांसारख्या नेत्यांनी वेगवेगळ्या काळात दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचा ठसा उमटवला. सध्याच्या राजकारणात शरद पवार, सुप्रिया सुळे, रामदास आठवले, विनोद तावडे आणि संजय राऊत यांसारखे महाराष्ट्रातील नेते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. 

मात्र अनुभव, संघटनात्मक पार्श्वभूमी, प्रशासनाचा आवाका, कामाचा विस्तार, सर्वपक्षीय संपर्क आणि राष्ट्रीय स्तरावरील स्वीकार्यत या निकषांवर गडकरी हे महाराष्ट्राचा दिल्लीतील प्रमुख चेहरा म्हणून वेगळे ठरतात. त्यांच्या राजकारणाची ताकद केवळ पदात नाही, तर राजकीय विरोधकांशी संवाद ठेवूनही स्वतःचे राजकीय वजन कायम राखण्यात आहे. याचमुळे राष्ट्रीय राजकारणात स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केलेल्या नेत्यांच्या यादीत नितीन गडकरींचे स्थान निश्चितच महत्त्वाचे ठरते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT