Bjp-Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

BJP Politics : सांगली, पुण्यावर भाजपचे प्रेम का?

Sandeep Chavan

BJP Politics : पुण्यातून एक जण विधानपरिषदेवर असताना आणखी दोन जणांना पाठवणं आणि सांगलीतूनही एक जण विधानपरिषदेवर असताना आणखी एक जणाला पाठवलं जाणं यामुळं सातारा, कोल्हापूर, सोलापूर या उर्वरित जिल्ह्यांनी भाजपचं काय घोडं मारलंय, असा सवाल आता पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्याच नेत्यांकडून विचारला जाऊ लागलाय. सांगली, पुण्याला गोंजारत असताना उर्वरित जिल्ह्यांना का डावलतंय? सांगली, पुण्यावरच भाजपचं प्रेम का?

पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे जिल्हे येतात मात्र अलिकडे भाजपकडून पुणे आणि सांगली जिल्ह्याला झुकते माप देण्यात येत असल्याबद्दल सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी नाराजी सूर आळवल्याचे पाहायला मिळाले. या नाराज कार्यकर्त्यांना आपल्या जिल्ह्यावर अन्याय झाला, असे का वाटते हे समजून घ्यावे लागेल.

भाजपचे सांगली, पुण्यावरच 'प्रेम'

कोथरूड विधानसभेचे तिकीट नाकारल्यानं भाजपमध्ये नाराज असलेल्या पुण्याच्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यानंतर पहिल्याच फटक्यात खासदार झालेले पुण्याचे मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यात आले. केवळ एवढ्यावरच भाजपचे पुण्यावरील प्रेम संपले नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत पुण्यातील आणखी दोघांची वर्णी लागली. पुणे जिल्ह्यातील उमा खापरे विधान परिषदेवर असताना योगेश टिळेकर आणि अमित गोरखे या दोन नेत्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले.

तिकडं सांगलीच्या बाबतीतही तसेच! गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील नेते विधान परिषदेवर असताना पुन्हा त्याच जिल्ह्यातील सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर घेण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण 58 मतदारसंघ तर लोकसभेचे 05 मतदारसंघ येतात.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपची स्थिती

पुणे - मतदारसंघ (21) - भाजप आमदार (08)

सांगली - मतदारसंघ (08) - भाजप आमदार (02)

सातारा - मतदारसंघ (08) - भाजप आमदार (02)

कोल्हापूर - मतदारसंघ (10) - भाजप आमदार (00)

सोलापूर - मतदारसंघ (11) - भाजप आमदार (05)

कोल्हापुरात भाजपचे 'शून्य' आमदार-खासदार

पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 58 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपकडे जागा आहेत 17 म्हणजे भाजपचे आमदार आहेत 58 पैकी 17. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण 05 मतदारसंघ येतात. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 05 पैकी 04 म्हणजे कोल्हापूर वगळता सर्व जागा लढवल्या होत्या मात्र त्यापैकी सातारा आणि पुणे या दोनच जागा जिंकता आल्या. कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार-खासदार नाही. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे खासदार आहेत 5 पैकी अवघे 02.

पश्चिम महाराष्ट्रातील केवळ दोघे जण मंत्रिमंडळात!

सध्याच्या राज्य मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्रातील अवघ्या 02 आमदारांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील मिरजचे आमदार सुरेश खाडे आणि पुण्यातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील. सुरेश खाडे कामगार मंत्री आहेत तर चंद्रकांत पाटील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विचार केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील अवघ्या एका खासदाराचा समावेश आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ. मुरलीधर मोहोळ केंद्रीय सहकार आणि नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री आहेत. सातारा आणि सोलापुरातील आमदारांची मिळून एकूण संख्या 07 च्या घरात जाते पण त्यापैकी एकालाही राज्य मंत्रिमंडळात स्थान नाही. पश्चिम महाराष्ट्रातून फक्त पुणे आणि सातारा या दोनच ठिकाणचे खासदार निवडून येऊनसुद्धा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान नाही.

पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष?

थोडक्यात, राज्य मंत्रिमंडळातही सांगली, पुण्याला झुकतं माप, विधान परिषदेतही सांगली, पुण्याला झुकतं माप आणि केंद्रीय मंत्रिमंडळातही पुण्याला झुकतं माप! त्यामुळं सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील निष्ठावान कार्यकर्ते, नेते लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत. एकूणच काय तर निष्ठावंतांचा हा नाराजीचा सूर पाहाता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपला एक-दोन जिल्हे सोडून उर्वरित पश्चिम महाराष्ट्राकडं दुर्लक्ष करून चालणार नाही हे नक्की!

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT