Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation demolished alleged illegal properties linked to MIM corporator Matin Patel after the Nida Khan controversy. sarkarnama
विशेष

Bulldozer Pattern : कंगना रानौतपासून मतीन पटेलपर्यंत अनेकांना 'बुलडोझर'चा दणका : टायमिंग अन् टार्गेटमुळे योगींचा 'पॅटर्न' वाढवतोय महाराष्ट्राची चिंता

निदा खान प्रकरणानंतर एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर बुलडोझर कारवाई झाली. यामुळे महाराष्ट्रात ‘बुलडोझर राजकारणा’वर नवी चर्चा सुरू झाली असून निवडक कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Hrishikesh Nalagune

नाशिकमधील ‘टीसीएस’ कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला घरात आश्रय दिला म्हणून ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांच्या 3 अनधिकृत मालमत्तांवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने बुलडोझर चालवला. या घटनेचे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर पडसाद उमटले. ही बुलडोझर संस्कृती महाराष्ट्रातही हळूहळू रुळायला लागल्याची चिंता व्यक्त होत आहे.

बेकायदा अतिक्रमणे असोत, की गुन्हेगारांची अवैध बांधकामे, त्यांच्यावर त्या त्या वेळी कारवाई व्हायलाच हवी. पण तिचे टायमिंग आणि निवडक स्वरूप ही गंभीर बाब आहे. सरसकट हातोडा वापरून कारवाईचा आव आणता येतो खरा, पण त्यामुळे न्यायनिवाडा होतोच असे नाही. गेल्या २-३ वर्षांत महाराष्ट्रात 'गुन्हेगारी पार्श्वभूमी' असलेल्या व्यक्तींच्या अवैध बांधकामांवर झालेल्या कारवायांची लक्षणीय आहे.

प्रशासन आताच जागे कसे?

निवडणूक लढविताना मतीन पटेल यांनी महापालिकेकडून नियमानुसार नाहरकत घेतले होते. त्यावेळी त्यांच्या मालमत्ता अनधिकृत आहेत की अधिकृत? हे तपासण्याची तसदी प्रशासनाने का घेतली नाही? पटेल यांचे वडील मजीद शेख यांनी हे प्लॉट १३ जानेवारी १९९२ रोजी खरेदी केले होते. तेव्हापासून हे कुटुंब तिथे वास्तव्यास असून ते नियमितपणे मालमत्ता कर भरत आहे.

घराच्या नूतनीकरणासाठी जानेवारी-२०२४ मध्ये ‘फेड बँके’कडून २० लाख रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे. असे असताना केवळ निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे पटेल यांच्या अनधिकृत मालमत्तांचा सफाया करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पटेल यांच्या अनधिकृत मालमत्तांचा शोध घेत अवघ्या सहा दिवसांत मालमत्ता जमीनदोस्त केल्या.

वास्तविक याविरोधात तत्काळ कारवाई करण्यास प्रशासनाला कोणी अडवले होते? परंतु आत्ताच एकदम या प्रश्‍नाची ढाल पुढे करून निवडक कारवाई करण्याचे समर्थन कसे होऊ शकते, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान, या कारवाईमुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील गुंठेवारीतील सुमारे ४० ते ४२ टक्के मालमत्ता चर्चेत आहेत.

गुंठेवारी वसाहती बनल्या डोकेदुखी :

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी वसाहती महापालिकेसाठी डोकेदुखी बनल्या आहेत. २० बाय ३० आकाराचे प्लॉट तयार करून कुठल्याही सोयी-सुविधा न देता भूखंड माफियांनी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

‘बुलडोझर’चा प्रवास

महिला आणि गरिबांवरील अत्याचारात सामील गुन्हेगारांच्या मालमत्तांवर बुलडोझर फिरवला जाईल असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर मुख्तार अन्सारी आणि अतिक अहमदसारख्या माफियांच्या मालमत्ता लक्ष्य करण्यात आल्या. आंदोलने, जातीय दंगली किंवा दगडफेकीत सामील व्यक्तींच्या घरांवरही बुलडोझर कारवाई करण्यात आली.

प्रयागराज, कानपूर, सहारनपूर, वाराणसीमध्ये बुलडोझर चालवून मालमत्ता जमीनदोस्त करण्याच्या अनेक घटना घडल्या. उत्तर प्रदेशच्या ‘बुलडोझर तंत्रा’चे मध्य प्रदेश, हरियाना, दिल्ली आणि आसाम या भाजपशासित राज्यांकडूनही अनुकरण करण्यात आले. ‘बुलडोझर बाबा’ नावाने योगी आदित्यनाथ यांची ख्याती झाली.

महाराष्ट्रातही 'बुलडोजर पॅटर्न'

महाराष्ट्रातही यापूर्वी अशाप्रकारच्या कारवाया झाल्या आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये अभिनेत्री कंगना रानौत हिने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर तिच्या मणिकर्णिका फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसवर चुकीच्या पद्धतीने बांधकाम नकाशात बदल केल्याचा दावा करत कारवाई केली होती.

त्यानंतरच्या 6 वर्षांच्या काळात मुंबईतील संतोषनगरपासून नागपूरमध्ये कुख्यात गुंड संतोष आंबेकर, कुख्यात गुंड अबू खान आणि अन्य ड्रग्ज तस्करीतील आरोपी, नाशिकमध्ये ललित पाटीलपासून पंचवटी आणि सातपूर भागात अनेक 'गॅंगस्टर्स' या विविध ठिकाणी अनेक कारवाई झाल्या आहेत.

देशभरातही आसाम, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये अशाप्रकारच्या कारवाया झाल्याची उदाहरण आहेत. या सगळ्या कारवायांची चर्चा 'बुलडोझर कारवाई' म्हणून होत असली, तरी रेकॉर्डवर याला "अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम" असेच म्हटले जाते. कारण कायद्याने केवळ 'गुन्हेगार आहे' म्हणून घर पाडता येत नाही; त्यासाठी ते 'अवैध' असणे तांत्रिकदृष्ट्या गरजेचे असते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT