Sanjay Raut  Sarkarnama
विशेष

Sanjay Raut Violation of Right Case : संजय राऊतांवरील कारवाईचा निर्णय होणार दिल्लीत : हक्कभंग प्रकरण राज्यसभेत पाठविणार

विधानसभेकडून आजच हक्कभंग प्रकरण राज्यसभेकडे पाठविण्यात येणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंगाच्या कारवाईचा चेंडू आता केंद्राच्या कोर्टात जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभेकडून हे हक्कभंगाचे प्रकरण राज्यसभेत पाठविले जाणार आहे, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राऊत यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा निर्णय दिल्लीत होणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. (Case of violation of rights against Sanjay Raut will be sent to the Rajya Sabha)

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या विधीमंडळाला चोर मंडळ म्हटले आहे, असा आरोप राज्यातील सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, आपण शिंदे गटातील आमदारांना उद्देशून चोर मंडळ म्हटलो होतो, असा दावा संजय राऊत करत आहेत. दरम्यानच्या काळात राऊत यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यात आला आहे.

विधीमंडळाकडून संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस देण्यात आलेली आहे. त्याला आपण कायदेशीर उत्तर देणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, खासदार राऊत यांच्यावरील हक्कभंग कार्यवाईसंदर्भात राज्यसभेचा अभिप्राय घेण्याचा निर्णय महाराष्ट्र विधीमंडळाने घेतला आहे. त्यानुसार हक्कभंग कारवाईचे प्रकरण राज्यसभा सचिवालयाकडे पाठविले जाणार आहे.

विधानसभेकडून आजच हक्कभंग प्रकरण राज्यसभेकडे पाठविण्यात येणार आहे. खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा निर्णय आता दिल्लीतीच होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यसभेच्या अभिप्रायाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यावरून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून १ मार्च रोजी खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. विधानसभा सचिवांकडून त्यांना नोटीस देण्यात आली होती. राऊतांचे लेखी उत्तर न आल्यास हक्कभंग समिती पुढील कारवाईचा निर्णय घेऊ शकते. आता हे प्रकरण केंद्राच्या कोर्टात ढकलण्याचा निर्णय विधानमंडळाने घेतला आहे.

कोण आहेत हक्कभंग समितीत?

राहुल कुल (समितीचे अध्यक्ष) अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नीतेश राणे, अभिमन्यू पवार (सर्व भाजप), संजय शिरसाट, सदा सरवणकर, आशिष जैस्वाल (शिवसेना शिंदे गट), दिलीप मोहिते, माणिकराव कोकाटे, सुनील भुसारा (राष्ट्रवादी काँग्रेस), नितीन राऊत, सुनील केदार (काँग्रेस), विनय कोरे (जनसुराज्य) या आमदारांचा हक्कभंग समितीमध्ये समोवश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT