Sanjay Raut-Sharad Pawar-chandrakant Patil
Sanjay Raut-Sharad Pawar-chandrakant Patil Sarkarnama
विशेष

उद्धवजी, पुन्हा सांगतो... सावध राहा : राऊतांच्या भूमिकेवरून चंद्रकांत पाटलांचा सल्ला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ‘ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकाराशिवाय नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पर्याय, विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही,’ असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (ता. ४ एप्रिल) सकाळी केले होते. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उत्तर देताना ‘संजय राऊतांकडून रोज सकाळी उठून शरद पवारांचेच नामस्मरण सुरू आहे. त्यामुळे उद्धवजी, पुन्हा सांगतो...सावध राहा’ असा सल्ला खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला आहे. (Chandrakant Patil advises Uddhav Thackeray to be wary of Sanjay Raut's role)

गेल्या काही दिवसांपासून यूपीएचे अध्यक्षपद आणि देश पातळीवर भाजपविरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. ‘यूपीए’चे अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्यात यावे, तसेच देशभरातील विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यासंदर्भात संजय राऊत यांनी आज सकाळी भाष्य केले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, ‘३०१ खासदार निवडून आणणाऱ्या मोदीजींसमोर संजय राऊत हे शरद पवारांचा पर्याय दाखवत आहेत. सत्तेचा मोह इतका वाढला आहे की, आपण धनुष्याच्या बाणात आहोत की घड्याळाच्या काट्यात, याचाच त्यांना विसर पडला आहे. रोज सकाळी उठून शरद पवारांचं नामस्मरण सुरूच आहे. उद्धवजी, पुन्हा सांगतो... सावध राहा! असे सांगून आमदार पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे.

काय म्हणाले होते राऊत?

शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. देशातील विरोधी पक्षांनी एकत्रित यावेत, यासाठी हालचाली होत आहे. पवार यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे काम पुढं जाऊ शकत नाही. पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय आणि विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते.

शरद पवारांचा मात्र नकार

शरद पवार यांनी मात्र यूपीएच्या अध्यक्षपदासाठी मला रस नाही, जनाधार असलेल्या पक्षांना एकत्र घेऊन पर्याय द्यावा, विरोधकांनी एकत्र यावे, यासाठी मी पाठिंबा आणि जी मदत हवी असेल ती देणार आहे. मी काही नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने यूपीएचा अध्यक्ष व्हावा, यासाठी ठराव केला होता. मात्र मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्यात पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना सहकार्य देण्यासाठी माझी तयारी आहे, असे स्पष्ट केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT