मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. पण, त्यांचा पक्ष कधीही ६० आमदारांच्यावर गेलेला नाही. आतापर्यंत त्यांचं राजकारण बघा, जेव्हा जेव्हा ते सत्तेमध्ये आले, तेव्हा तेव्हा कुणाली तरी फोडून किंवा संपवून ते सत्तेत आलेले आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पवार यांच्यावर केली. (Chandrashekhar Bawankule's criticism of Sharad Pawar's visit to Maharashtra)
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता. ३० ऑगस्ट) कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बावनकुळे यांनी वरील उत्तर दिले. ते म्हणाले की, गेली अडीच वर्षे पवार यांना फिरण्याची खूप संधी होती. पण ते फिरले नाहीत.
उद्धव ठाकरे यांनाही राज्यभर फिरण्याची संधी होती. मात्र, कोरोना काळात लोकं जेव्हा मरत होते, तेव्हाही ते आणि मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी फिरू शकले असते. पण, वेगवेगळ्या कारणांनी ते फिरले नाहीत. आता ते फिरतायत. कुणालाही काही मनाई नाही. ते त्यांचा पक्ष वाढविण्यासाठी फिरत आहेत, त्याला कुणाचीही मनाई नाही. पण, महाराष्ट्राची जनता त्यांना विचारणार आहे की गेल्या अडीच वर्षांत तुम्ही कोठे गेले होते. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे सध्या गोंधळलेल्या मनःस्थितीत आहेत. त्यांची नेमकी भूमिका कळत नाही. उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे. जे शरद पवार आणि काँग्रेस पक्षाच्या सोबत बसतात, ते कशाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवत आहेत. आगामी काळात मतदानाच्या वेळी जनता ठरवेल की खरं हिंदुत्व कोणाचे आणि खोटं कुणाचे. मला आता पक्कं कळून चुकलं आहे की, उद्धव ठाकरे आता खरंच हिंदुत्ववादी राहिलेले नाहीत. त्यांनी सारं सोडून दिलं आहे. पारिवारिक प्रेमामध्ये ते साऱ्या गोष्टी विसरून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्राला बगल देऊन ते आपलं कर्तृत्व करत आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत बावनकुळे म्हणाले की, अमित शहा हे नेहमीच लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. या वेळी ते गणपतीच्या दर्शनासाठीच येत असावेत, असे मला वाटते. त्यांचा अधिकृत दौरा अद्याप आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.